|| रसिका मुळ्ये

निवडणुकीची कामे आणि पावसाचे थैमान यांत पहिले सत्र वाहून गेल्यानंतर आता दुसऱ्या सत्रात अध्यापनाकडे लक्ष देता येईल अशी आशा बाळगणाऱ्या शिक्षकांच्या मागे पुन्हा एकदा अभियानांचा ससेमिरा लागला आहे. शाळेत शौचालय दिन ‘साजरा’ करण्याचा फतवा शिक्षण विभागाने काढला असून त्याअंतर्गत ‘चला पाहू या शाळेचे शौचालय’ असा उपक्रम राबवण्याचे आदेश शाळांना देण्यात आले आहेत.

‘अभियानग्रस्त’ झालेल्या राज्यातील शाळांमध्ये अभियानाची अहवालपूर्ती करण्यासाठी स्पर्धा, विविध स्थळांना भेटी असे उपक्रम राबवण्याची जबाबदारी शिक्षकांना पेलावी लागते. या वेळी मात्र शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना शाळेचे शौचालय दाखवण्याचा उपक्रम घेण्याची सूचना शाळांना दिली आहे. त्यासाठी गावातील प्रमुख, सरपंच यांनाही बोलावण्यात यावे असे विभागाचे म्हणणे आहे. मुळात शाळांमध्ये शौचालय असणे, ते वापरण्यायोग्य असणे आणि त्याचा प्रत्यक्षात वापर होणे या खरेतर मूलभूत आणि अत्यावश्यक बाबी आहेत. मात्र एखादे नवे ठिकाण दाखवण्याच्या आविर्भावात आता विद्यार्थ्यांना शाळेतील शौचालय दाखवायचे  का असा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला आहे शिक्षकांसाठी ‘शोचनीय’ सूचना.. शौचालय स्वच्छ व वापरायोग्य करून शौचालय दिन साजरा करावा, शाळेतील बंद शौचालय उघडण्यात यावे, शौचालयाची सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय आणि त्यामुळे होणारे शैक्षणिक नुकसान यावर एकांकिका बसवावी, शौचालय कसे वापरावे याची सचित्र भित्तिपत्रके तयार करण्यात यावीत, ‘कौन बनेगा क्लीन’ अशी प्रश्नमंजूषा स्पर्धा शाळांमध्ये घेण्यात यावी, असे उपक्रम घेण्यात यावेत आणि त्याचा अहवाल पाठवावा, अशी सूचना शाळांना करण्यात आली आहे. शौचालय वापराबाबत जागृती व्हावी. विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व कळावे यासाठी हे उपक्रम घेण्यात यावेत असे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. शाळेतील शौचालयांची दुरुस्ती करणे, त्यासाठी देणगी गोळा करण्याच्या सूचनाही शिक्षकांना देण्यात आल्या आहेत.

 अन् या शाळांचे काय?

राज्यातील शाळांमध्ये अद्यापही पुरेशी शौचालये नाहीत. गेल्या वर्षी प्रथम संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार राज्यातील साधारण २ टक्के शाळांमध्ये शौचालये नाहीत तर २९ टक्के शाळांमधील शौचालये वापरण्यायोग्य नाहीत. शौचालय आहे पण पाणी नाही, कडय़ा नाहीत, खिडक्या तुटलेल्या अशी अवस्था राज्यातील शाळांमध्ये दिसते. राज्यातील साधारण सतराशे शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नसल्याचे समोर आले होते. त्याबाबत एप्रिलमध्ये शिक्षण विभागाच्या सचिवांनी एप्रिलमध्ये शाळांना तंबीही दिली होती.

होणार काय?

जागतिक शौचालय दिन ‘साजरा’ करण्यासाठी शाळांमध्ये आठवडाभर विविध उपक्रम घेण्याची सूचना शिक्षण विभागाने दिली आहे. त्यामध्ये ‘चला पाहू या शाळेचे शौचालय’ अशा उपक्रमाचाही समावेश करण्यात आला आहे. यामध्ये गावांतील मान्यवरांच्या साक्षीने शाळेतील स्वच्छतागृहांच्या परिस्थितीची छाननी करण्यात येईल. त्यामुळे आधीच वेगवेगळ्या अभियानांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या माथी वर्गात शिकविण्यासोबत शौचालयसंबंधित अध्र्या डझनाहून अधिक उपक्रमांचे ओझे येणार आहे.