प्रिय व्यक्तीच्या अकाली जाण्याच्या दु:खातून सावरत इतरांना जीवनदान देण्याच्या पालकांच्या निर्णयामुळे गेल्या २० दिवसांत केईएम रुग्णालयात अनेक रुग्णांना नव्याने आयुष्य जगण्याची संधी प्राप्त झाली आहे. याद्वारे पालिका रुग्णालयातील अवयवदानास पुन्हा एकदा प्रारंभ झाला आहे.
जनजागृती, रुग्णांच्या पालकांनी दाखवलेली जागरूकता, कर्तव्यदक्ष वृत्ती आणि डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे खासगी रुग्णालयात अवयवदानाची संख्या वाढत आहे. रुग्ण दगावण्यावेळी नातेवाईकांची मनस्थिती तसेच कायदेशीर प्रक्रियेतील गुंतागुंतीमुळे गेली काही वर्षे पालिका रुग्णालयातील अवयवदानाबाबत उदासीनता आली होती. महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांच्या संचालिका डॉ. सुहासिनी नागदा यांनी मात्र या प्रक्रियेला पुन्हा चालना दिली. यासाठी डॉ. रवी बापट यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञांची समिती कार्यरत असून अवयवदानाबाबत जागरूकताही करण्यात येत आहे.
अवयवदानासाठी प्रतिक्षायादीत असलेल्या रुग्णांनाही अवयवदान करण्यात आले. केईएम रुग्णालयातील मेंदूविकारतज्ज्ञ आणि विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्राच्या डॉ. सुजाता पटवर्धन यांची यात महत्त्वाची भूमिका बजावली.
विलासराव देशमुख यांचा यकृतविकाराने मृत्यू झाल्यानंतर राज्यात अवयवदानाच्या चळवळीला बळ मिळाले. मेंदू मृतावस्थेत गेलेल्या रुग्णांच्या अवयवामुळे अनेकांना जीवदान मिळू शकते, ही कल्पना जनमानसात रुजल्याने २०१२ मध्ये मुंबईत २६ तर २०१३ मध्ये २० जणांनी अवयवदान केले. अशा व्यक्तीचे मूत्रपिंड, यकृत, डोळे, त्वचा इत्यादी अवयवांचे प्रत्यारोपण केले जाते. ‘केईएमसोबतच नायर व सायन येथील रुग्णालयातूनही अवयवदानासाठी नातेवाईकांनी पुढे यावे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मूत्रपिंड, यकृत तसेच डोळे यांच्या प्रत्यारोपणासाठी शेकडो रुग्ण वाट पाहत असल्याने अवयवदानाबाबत अधिकाधिक जागृती करण्यावर भर दिला जात आहे,’ असे डॉ. नागदा म्हणाल्या.  

लोकलमधून पडल्याने जबर जखमी झालेल्या २० वर्षांच्या तरुणाला केईएममध्ये आणण्यात आले होते. डॉक्टरांनी आटोकाट प्रयत्न करूनही तो वाचू शकला नाही. या तरुणाच्या पालकांनी स्वत:हून इच्छा व्यक्त करून अवयवदान केले. गेल्या आठवडय़ातही १९ वर्षांंचा तरूण जखमी अवस्थेत केईएममध्ये दाखल झाला. रिक्षाचालक असलेल्या त्याच्या वडिलांना समुपदेशकांनी अवयवदानाची माहिती दिली. सुरुवातीला भांबावलेल्या वडिलांनी त्यानंतर मात्र व्यापक हित लक्षात घेतअवयवदान केले. दोघांच्याही मूत्रपिंडाचे २४ तासांत प्रत्यारोपण करण्यात आले.