रायगड जिल्ह्य़ातील सामाजिक बहिष्काराची प्रकरणे हे सामाजिक सौहार्दाला आव्हान ठरत असून अशा प्रकरणातील दोषींना दयामाया न दाखविता कठोर कारवाई केली पाहिजे, असा सूर आता पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेतही उमटू लागला आहे. वाळीत टाकण्याच्या प्रथेविरुद्ध या यंत्रणा सज्ज झाल्याचे लक्षात येताच गावकीच्या नावाने मनमानी करणाऱ्या तथाकथित पुढाऱ्यांनी नांग्या टाकण्यास सुरुवात केली असून महाड तालुक्यात गावकी प्रथा गुंडाळण्याची तयारी सुरू झाली आहे.
क्षुल्लक कारणांसाठी एखाद्या कुटुंबाला वाळीत टाकण्याचे प्रकार रोखण्यासाठी सरसकट गुन्हे दाखल करणे आणि गावातील स्वत:ला प्रतिष्ठित म्हणविणाऱ्यांना दयामाया न दाखविता तुरुंगात डांबणे, हाच मार्ग असल्याचे मत रायगडचे माजी अधीक्षक अंकुश शिंदे यांनी व्यक्त केले. आपल्या दोन वर्षांच्या कालावधीत वाळीतप्रकरणी २२ गुन्हे दाखल केल्यानंतर कारवाईला घाबरून महाडमध्ये काही गावांतील बहिष्कार मागे घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
रायगड जिल्ह्य़ातील वाळीत प्रकरणांमुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. गावकीतील पंच मंडळींच्या मनमानीमुळे क्षुल्लक कारणांसाठी कुटुंबांवर बहिष्कार टाकला जातो आणि ही कुटुंबे अक्षरश: उद्ध्वस्त होतात. वर्चस्वाची हाव, पैशाचे व्यवहार, जमिनींची प्रकरणे, राजकारण अशी अनेक कारणे या प्रथेस कारणीभूत असल्याचे उघड होऊ लागले आहे. वाळीत प्रकरणात कारवाई करण्यासाठी पूर्वी एक कायदा होता. तो कालबाह्य़ झाला. श्रीवर्धनमधील एका वाळीत प्रकरणात भारतीय दंड संहितेतील तरतुदीनुसार कारवाई करा, असे आदेश आल्यानंतर रायगड जिल्ह्य़ात २२ गुन्हे दाखल झाले. यापैकी बहुतांश सर्व प्रकरणांत आरोपपत्रे दाखल झाली असली तरी अजूनही काही प्रकरणे मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहेत. मात्र कारवाई होऊन प्रतिष्ठितांना गजाआड व्हावे लागल्यानंतर महाडमधील चार-पाच मंडळांनी जाहीर सभा घेऊन असा बहिष्कार उठविला होता. लोकशाहीत कोणाच्याही हक्कावर गदा आणता येणार नसल्याचे विधानही या सभेत केले गेले होते. काही गावांत आता या प्रथेविरुद्ध आवाज उठविला जात आहे, तर कुठे गावकीलाच एकाकी ठरविण्यासाठी गाव संघटित होऊ लागले आहे.  वाळीत प्रकरणात पोलिसांकडून कारवाई होत असल्याचे पाहून अनेक कुटुंबे तक्रार दाखल करण्यासाठी पुढे आली. समाजात दुही माजविणे वा एखादी रक्कम मागितल्यास भारतीय दंड संहितेनुसार खंडणीचा गुन्हाही दाखल करता येऊ शकतो. हे सर्व गुन्हे अजामीनपात्र आहेत, याकडे अंकुश शिंदे यांनी लक्ष वेधले. वाळीत प्रकरणात गुन्हे दाखल करण्याचे आदेश आपणही पोलीस ठाण्यांना दिले आहेत, असे विद्यमान अधीक्षक डॉ. शशिकांत महावरकर यांनी सांगितले.