माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांची सरकारवर टीका

काळ्या पैशाचे उच्चाटन, बनावट चलन व त्याद्वारे आतंकवाद्यांना होणारा आर्थिक पुरवठा थांबवण्यासाठी निश्चलनीकरणाचा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारकडून गेल्या वर्षभरात वारंवार सांगितले गेले. मात्र वर्षभरानंतर या तीनही मुद्दय़ांकडे कटाक्ष टाकला असता, यात काहीच फरक पडला नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे निश्चलनीकरणामुळे देशातील जनतेला झळ सोसावी लागण्याव्यतिरिक्त आणखी काहीही साध्य झालेले नाही, अशा शब्दांत माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी निश्चलनीकरणाच्या निर्णयातील फोलपणा पुन्हा एकदा दाखवून दिला. ‘टाटा लिट लाइव्ह’ या साहित्य महोत्सवात ते बोलत होते.

शनिवारी साहित्य महोत्सवात ज्येष्ठ पत्रकार एन. राम यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘व्हाय स्कॅम्स आर हिअर टू स्टे’ या भारतातील भ्रष्टाचार व राजकीय संस्कृतीवर भाष्य करणाऱ्या पुस्तकावर आधारित चर्चेत चिदम्बरम सहभागी झाले होते. या वेळी त्यांनी निश्चलनीकरणाच्या निर्णयावर परखड भाष्य केले.

गेल्या वर्षी, ८ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निश्चलनीकरणाचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार ८६ टक्के चलन बेकायदेशीर ठरवण्यात आले. काळा पैसा व बनावट चलनाचे उच्चाटन करणे आणि आतंकवाद्यांना होणारा आर्थिक पुरवठा थांबविण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारकडून गेल्या वर्षभरात सातत्याने सांगितले गेले. मात्र वास्तवात या तीनही बाबतीत काहीच फरक पडला नसल्याचे त्यांनी सांगितले.

या चर्चेत रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर वाय. व्ही. रेड्डी हेही सहभागी झाले होते. त्यांनीही निश्चलनीकरणावर आपले मत मांडले. हा निर्णय घेताना त्याच्या परिणामांचाही गांभीर्याने विचार करायला हवा होता, निश्चलनीकरणामुळे तब्बल तीन महिने जनतेला मोठय़ा प्रमाणात त्रास सहन करावा लागला, मात्र त्याचा गांभीर्यपूर्वक विरोध झाला नसल्याची खंत रेड्डी यांनी या वेळी व्यक्त केली.

दहशतवादी कारवायांमध्ये वाढ

बनावट चलनातून आतंकवाद्यांना आर्थिक पुरवठा केला जातो आणि तो थांबविण्यासाठीच निश्चलनीकरण केले आहे, असा युक्तिवाद पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून केला गेला. याचा अर्थ निश्चलनीकरणानंतर आतंकवादी कारवाया थांबायला हव्या होत्या. मात्र तसे झालेले दिसत नाही. याच महिन्यात आलेल्या आकडेवारीनुसार, यंदा काश्मीरमध्ये आतंकवादी कारवाया व त्यात लष्करी जवान व नागरिकांच्या हत्यांचे प्रमाण हे गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक असल्याचे चिदम्बरम यांनी नमूद केले.