प्रथमश्रेणीच्या प्रवाशांना प्रवाशांना वाढीव रक्कम भरून प्रवासाची मुभा

जास्तीत जास्त प्रवाशांनी वातानुकूलित गाडीने प्रवास करावा यासाठी प्रथम श्रेणी आणि वातानुकूलित लोकल गाडीच्या तिकिट दरातील फरक वसुल करून वातानुकूलित लोकलने प्रवास करण्याची मुभा प्रथम श्रेणी प्रवाशांना देण्याचा निर्णय घेण्यात आला असून गेल्या दोन दिवसात केवळ ११ प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.

पश्चिम रेल्वेला  वातानुकूलित लोकल गाडीच्या सेवेतून आतापर्यंत ५९ लाख रुपयाहून अधिक उत्पन्न मिळाले आहे. तर तब्बल एक लाख ३२ हजार प्रवाशांनी या लोकला गाडीतून प्रवास केल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली. २५ डिसेंबरपासून वातानुकूलित लोकल गाडी पश्चिम रेल्वे प्रवाशांच्या सेवेत आली. चर्चगेट ते बोरीवली आणि विरापर्यंत या गाडीच्या एकूण १२ फेऱ्या होतात. ही लोकल चालविताना सामान्य लोकल गाडीच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्याने सुरुवातीला बोरीवलीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी वातानुकूलित लोकल गाडीच्या फेऱ्यांना विरोध केला होता. किमान प्रथम श्रेणी प्रवाशांना सामान्य लोकलच्या पासावरच प्रवास करण्याची मागणीदेखिल करण्यात आली.

जादा भाडे यामुळे वातानुकूलित लोकल गाडीला सुरुवातीला कमी प्रतिसाद मिळत गेला. पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार २५ डिसेंबर रोजी या लोकलमधून ७३६ प्रवाशांनी प्रवास केला होता आणि ६८ हजार रुपये उत्पन्न मिळाले होते. ३१ डिसेंबपर्यंत मिळणाऱ्या अल्प प्रतिसादानंतर मात्र १ जानेवारीपासून प्रवाशांचा वातानुकूलित लोकल गाडीला प्रतिसाद वाढत गेला. ४ जानेवारी रोजी सात हजार ८३५ आणि ८ जानेवारी रोजी सर्वात जास्त दहा हजार प्रवाशांनी प्रवास केला. वाढलेल्या प्रतिसादामुळे तिकिट विक्री आणि पासातून आतापर्यंत पश्चिम रेल्वेला ५९ लाख रुपयांहून अधिक उत्पन्न मिळाले आहे. पश्चिम रेल्वेवर वातानुकूलित रेल्वे चालवणे सध्यातरी व्यवहार्य नसल्याचे यासंदर्भात म्हटले होते. ही गाडी नेहमीच्या लोकलच्या वेळापत्रकानुसार सोडता येणार नाहीत. विशिष्ट कालावधतीच त्या चालविता येणे शक्य असल्याचे म्हटले होते.

* वातानुकूलित लोकल गाडीतून २३ डिसेंब ते २५ डिसेंबरपर्यंत १९४ विनातिकिट प्रवाशांना पकडण्यात आले.

* ५२७  हाय ट्रॅव्हल प्रकरणांची नोंद झाली आहे. प्रथम आणि दुसऱ्या श्रेणीच्या तिकिटावरच वातानुकूलित लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही पकडण्यात आले. त्यांचावरही दंडात्नक कारवाई करण्यात आली आहे.