गुजरातचे प्रभारी गुरुदास कामत यांचा दावा; ग्रामीण भागात सरकारबद्दल नाराजी

गुजरातमधील ग्रामीण भागात मिळालेल्या यशात पटेल समाजाच्या आंदोलनाचा तेवढा प्रभाव नसल्याचा दावा काँग्रेसचे सरचिटणीस आणि गुजरात राज्याचे प्रभारी गुरुदास कामत यांनी केला.
हार्दिक पटेल यांच्या नेतृत्वाखाली अहमदाबाद, सुरत आदी शहरांमध्ये मोठाले मेळावे झाले होते. अहमदाबाद, बडोदा यासह सहा महानगरपालिकांमध्ये काँग्रेसच्या जागांमध्ये वाढ झाली असली तरी सत्ता मात्र भाजपने कायम राखली आहे. यावरून पटेल समाजाचे आंदोलन किंवा मेळाव्यांना मोठय़ा प्रमाणावर प्रतिसाद मिळालेल्या शहरांमध्ये भाजपने आपला प्रभाव कायम राखल्याचे चित्र स्पष्ट होते, असे कामत यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. काँग्रेसला ग्रामीण भागात यश मिळाले आहे. पटेल समाज भाजपच्या विरोधात गेला हे चित्र निर्माण करण्यात येत असले तरी तशी वस्तुस्थिती नाही. शहरी भागांमध्ये भाजपलाच यश मिळाले आहे.
ग्रामीण भागात भाजपच्या धोरणांबद्दल नाराजी होती. शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पाळण्यात आलेली नाहीत. काँग्रेसने यावर प्रचारात भर दिला. लोकसभा निवडणुकीत गुजरातमधील सर्व जागा भाजपने जिंकताना ५९ टक्के मते मिळाली होती. काँग्रेसला ३५ टक्क्यांच्या आसपासच मते मिळाली होती. या वेळी मात्र काँग्रेसला भाजपपेक्षा जास्त मते मिळाली आहेत.

२५ जिल्हा परिषदांमध्ये सत्ता
गुजरातमधील ३१ पैकी २३ जिल्हा परिषदांमध्ये स्वबळावर सत्ता मिळाली आहे. दोन जिल्हा परिषदांमध्ये जनता दल व अन्य छोटय़ा पक्षांच्या मदतीने सत्तेत येऊ. म्हणजेच ३१ पैकी २५ जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसची सत्ता येईल. गेल्या वेळी एक जिल्हा परिषद वगळता अन्यत्र भाजपची सत्ता होती याकडे कामत यांनी लक्ष वेधले.