आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू

मुंबई : डॉ. पायल तडवी यांनी आत्महत्या केली हे या तिघांनाच कसे समजले, असा सवाल करत तडवी कुटुंबाने आरोपी डॉक्टरांना जामीन न देण्याची मागणी शुक्रवारी सत्र न्यायालयासमोर ठेवली.

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात आरोपपत्र दाखल होईपर्यंत आरोपींना जामीन न देण्याची तरतूद आहे, असा दावा तडवी कुटुंबाचे वकील अ‍ॅड. गुणरत्न  सदावर्ते यांनी केला. कायद्यात संबंधित सर्व सुनावण्यांचे चित्रीकरण, तक्रारदाराला सुरक्षा अशाही तरतुदी आहेत. मात्र राज्य शासनाने या प्रकरणात कोणतीही तरतूद गांभीर्याने घेतलेली नाही. १० जूनला सुनावणीसाठी न्यायालयात आलेल्या तडवी कुटुंबाला आरोपी आणि त्यांच्या नातेवाईकांनी धमकावले. त्या प्रकाराची पोलीस आयुक्तांकडे तक्रार केल्याचे अ‍ॅड. सदावर्ते यांनी न्यायालयाला सांगितले.

वर्तन, सधनतेमुळे आरोपी जामिनावर सुटल्या तर महत्त्वाचे पुरावे नष्ट करण्याची, महत्त्वाच्या साक्षीदारांवर दबाव आणण्याची कुवत आरोपींमध्ये आहे. अत्यंत शांत डोक्याने त्यांनी डॉ. पायल यांचा जातिवाचक छळ सुरू ठेवला. त्यांचे मानसिक शोषण केले आहे. या प्रकरणात डॉ. पायल यांच्या सहकारी आणि वसतिगृहातील खोलीत सोबत राहाणाऱ्या डॉ. स्नेहन शिंदे महत्त्वाच्या साक्षीदार आहेत. त्यांच्या साक्षीवरून डॉ. पायल यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या खोलीबाहेर सर्वप्रथम आरोपी पोहोचल्या. खोलीत राहाणाऱ्या डॉ. स्नेहल आत्महत्येबाबत अनभिज्ञ होत्या. मात्र त्याच वेळी आरोपी डॉक्टरना ही बाब आधीच समजली होती. डॉ. पायल यांना गळफास घेतलेल्या अवस्थेतून खाली उतरवल्यानंतर आरोपी डॉक्टर या खोलीत पुन्हा परतल्या होत्या, हे संशयास्पद आहे, हे मुद्देही त्यांनी आपल्या युक्तिवादातून न्यायालयासमोर ठेवले.

तत्पूर्वी युक्तिवाद करताना बचाव पक्षाचे वकील अ‍ॅड. आबाद पोंडा यांनी अटकेत असलेल्या तीन महिला डॉक्टर आहेत. त्यांना गुन्हेगारी पाश्र्वभूमी नाही. हेतुपुरस्सर त्यांच्याकडून काहीही घडलेले नाही. या आरोपांमुळे त्यांचे वैयक्तिक, व्यावसायिक आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांची पोलीस कोठडी घेतली. चौकशी केली. संबंधित सर्व साक्षीदारांचे जबाब नोंदवून झाले. आवश्यक ते पुरावे इतक्या दिवसात पोलिसांनी गोळा केले असावेत. त्यामुळे आता आरोपींना जामीन मिळायला काहीच हरकत नसावी, असा युक्तिवाद केला.

त्यास विशेष सरकारी वकील अ‍ॅड. राजा ठाकरे यांनी हरकत घेतली. डॉ. पायल यांचा मृत्यू झाला. त्यांनाही वैयक्तिक, व्यावसायिक आयुष्य होते. त्याही शिक्षित होत्या. आणखी शिकून निष्णात डॉक्टर बनू इच्छित होत्या. त्यांनाही कुटुंब होते, हा विचारही होणे आवश्यक आहे. डॉ. पायल यांची जात, पोट जात, आरक्षित जागांमधून मिळालेला प्रवेश किंवा वसतिगृहातील खोली याबाबत आरोपींना आधीपासून माहीत होते. डॉ. पायल यांना महाविद्यालयात टिकूच द्यायचे नाही, असा चंग आरोपींनी बांधला होता. जर आरोपींनी काही केलेच नव्हते तर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या पसार का झाल्या? त्यांनी स्वत:हून शरणागती का नाही पत्करली? असे मुद्दे मांडत अ‍ॅड. ठाकरे यांनी आरोपींना जामीन अर्जाला विरोध केला.

शुक्रवारी तिन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला असून सोमवारी आरोपींच्या जामीन अर्जावर न्यायालय निकाल देईल, अशी शक्यता आहे.