‘तृतीय वर्ष विज्ञान’ (बीएससी) शाखेच्या विविध विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षा ज्या केंद्रांवर सुरळीतपणे सुरू आहेत, त्या केंद्रांवर प्राध्यापकांच्या असहकारामुळे रखडलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने घेतला आहे.
लवकरच या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, असे परीक्षा नियंत्रक दीपक वेसावे यांनी सांगितले. प्राध्यापकांच्या असकारामुळे प्रत्येक दिवशी सुमारे ५० टक्के परीक्षा केंद्रांवर प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात विद्यापीठाला यश येत आहे. मंगळवारी ८६ पैकी केवळ ४६ परीक्षा केंद्रांवर प्रात्यक्षिक परीक्षा सुरळीतपणे पार पडू शकल्या, असे वसावे यांनी सांगितले.
बुक्टू या प्राध्यापकांच्या संघटनेचे सदस्य नसलेल्या आणि विनाअनुदानित महाविद्यालयांत कार्यरत असलेले काही प्राध्यापक परीक्षांवरील बहिष्कारात सहभागी नाहीत. या प्राध्यापकांच्या सहकार्याने काही केंद्रांवर परीक्षा घेण्यात विद्यापीठाला यश येत आहे. अशा केंद्रांवर बहिष्काराचा फटका बसलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा उरण्यात येणार आहेत, असे वसावे यांनी स्पष्ट केले. विद्यापीठासमोर आता खरे आव्हान तर टीबायबीकॉमच्या परीक्षांचे आहे. टीवायबीकॉमच्या विद्यार्थ्यांची संख्या एक लाखाच्या आसपास असते. शिक्षकांच्या सहकार्याविना ही परीक्षा घेणे विद्यापीठासमोर मोठे आव्हान असणार आहे. २८ मार्चपासून टीवायबीकॉमच्या परीक्षा सुरू होत आहेत. या परीक्षांच्या हॉलतिकीटांचे वाटप सुरू सध्या सुरू आहे. दरम्यान, राज्य सरकार आणि शिक्षकांच्या संघर्षांचा फटका विनाकारण विद्यार्थ्यांना बसतो आहे. हा प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रश्नात लक्ष घालून शिक्षकांना चर्चेसाठी बोलवावे, अशी विनंती करणारे पत्र खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केले आहे.