एकमेकांविरुद्ध चिथावणीखोर वक्तव्ये करून कार्यकर्त्यांना हिंसाचार करण्यासाठी प्रवृत्त केल्याच्या आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुद्ध दाखल याचिका मागे घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे.
‘राष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी जनशक्ती’ या संस्थेचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी दोन्ही नेत्यांवर चिथावणीखोर वक्तव्ये करून कार्यकर्त्यांना हिंसाचारासाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत तसेच त्यांच्याकडून सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीची भरपाई करून घ्यावी, अशी मागणी याचिकेद्वारे केली होती. न्यायमूर्ती पी. व्ही. हरदास आणि न्यायमूर्ती रेवती ढेरे यांच्या खंडपीठासमोर त्यावर सुनावणी झाली. याचिकेत काही तांत्रिक चुका असल्याने त्यात दुरुस्ती करावी, अशी सूचना न्यायालयाने याचिकादारांना केली. त्यानंतर ही याचिका मागे घेण्यासाठी परवानगी देण्याची मागणी याचिकादारांच्या वतीने करण्यात आल्यावर न्यायालयाने ती मान्य केली.