राज्यातील सर्व वसतिगृहे व भूमिगत जोडणी घेणारे घरगुती वीज ग्राहक यांना महावितरणकडून चुकीची व जादा दराने वीजबिल आकारणी होत असल्याबाबत महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने राज्य वीज नियामक आयोगात याचिका दाखल केली आहे.

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने यावेळी प्रथमच राज्यातील सर्व वसतिगृहांना सार्वजनिक सेवा ही वीजदर वर्गवारी लागू केलेली आहे. शाळा व महाविद्यालये यांना सार्वजनिक सेवा वीजदर वर्गवारी लागू आहे, त्यामुळे वसतिगृहांनाही सार्वजनिक सेवा वर्गवारी लागू करणे योग्य व आवश्यक आहे, अशी रास्त भूमिका आयोगाने घेतली आहे. या वर्गवारीमध्ये शाळा व महाविद्यालये यांच्याशी संलग्न असलेली सर्व वसतिगृहे, अन्य सर्व विद्यार्थी वसतिगृहे, कर्मचारी पुरुष व महिला वसतिगृहे, निराधार अनाथ व दिव्यांग वसतिगृहे, मनोरूग्ण व बाल सुधारगृहे, धर्मशाळा, निर्वासित व आपदग्रस्त छावण्या, अनाथाश्रम इ. सर्व वसतिगृहांचा समावेश आहे. अशा सर्व प्रकारच्या शासकीय व खाजगी वसतिगृहांना सार्वजनिक सेवा शासकीय वा सार्वजनिक सेवा अन्य या वीज दराने आकारणी १ एप्रिलपासून सुरू होणे अपेक्षित होते. पण महावितरणने तसे न करता वाढीव वीजबिल आकारले, असे महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी याचिकेत म्हटले आहे.

शहरी भागांत नवीन भूमिगत वीज जोडणी घेताना सर्वसामान्य घरगुती वीज ग्राहकांना वीजदर आदेशातील त्रुटीचा फटका बसत असल्याची अनेक उदाहरणे समोर आलेली आहेत. नवीन सेवा जोडणी आकार  ० ते ५ किलोवॉट पर्यंत ३४०० रुपये व ५ किलोवॉटचे वर ७६०० रुपये याप्रमाणे निश्चित करण्यात आले आहेत. तथापि आदेशात ५ ऐवजी०.५ अशी चूक झाल्यामुळे ०.५ किलोवॉटचेवर ५ किलोवॉटपर्यंत जोडभार मागणी करणा-या सर्व ग्राहकांवर ३४०० रुपयांऐवजी ७६०० रुपयांची आकारणी केली जात असून दुप्पट रक्कम वसूल केली जात आहे. त्यामुळे नवीन घरगुती भूमिगत जोडणी घेणाऱ्या सर्वसामान्य वीज ग्राहकांची बेकायदा लूट केली जात आहे. १ एप्रिलपासून जादा घेतलेल्या रकमा संबंधित वीज ग्राहकांना व्याजासह त्यांच्या वीज बिलांद्वारे परत करण्यात याव्यात अशीही मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

त्रुटीचा फटका : शहरी भागांत नवीन भूमिगत वीज जोडणी घेताना सर्वसामान्य घरगुती वीज ग्राहकांना वीजदर आदेशातील त्रुटीचा फटका बसत असल्याची अनेक उदाहरणे समोर आलेली आहेत. नवीन सेवा जोडणी आकार  ० ते ५ किलोवॉट पर्यंत ३४०० रुपये व ५ किलोवॉटचे वर ७६०० रुपये याप्रमाणे निश्चित करण्यात आले आहेत.