इंटरनेटचा कमी वेग, अ‍ॅप बंद होणे, जीपीएस सिग्नल गायब; स्पर्धामध्ये सहभागी होण्यापेक्षा खेळाडूंचा सरावावर भर 

मुंबई : ग्रामीण भागात इंटरनेटचा कमी असलेला वेग, गायब होणारा जीपीएस सिग्नल, बंद पडणारे अ‍ॅप अशा कारणांमुळे आभासी (व्हच्र्युअल) पद्धतीने आयोजित मॅरेथॉन अथवा इतर क्रीडा स्पर्धामध्ये सहभागी होणाऱ्या हौशी खेळाडूंना अडचणींचा मोठा सामना करावा लागत आहे. यांमुळे खेळाडू आभासी (व्हच्र्युअल) क्रीडा स्पर्धामध्ये सहभागी होण्यापेक्षा सराव करण्यातच धन्यता मानत आहेत.

करोनामुळे मार्चपासून लागू केलेल्या देशव्यापी टाळेबंदीमुळे अनेक महत्त्वाच्या मॅरेथॉन अथवा इतर क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. तर काही स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परिणामी, काही क्रीडा स्पर्धा आभासी (व्हच्र्युअल ) पद्धतीने आयोजित केल्या जात आहेत. यात प्रामुख्याने धावणे, सायकल चालवणे, दोरीच्या उडय़ा मारणे यांचा समावेश आहे. आभासी (व्हच्र्युअल) पद्धतीच्या क्रीडा स्पर्धामध्ये खेळाडू शहराजवळील परिसरात धावतात. आपण केलेल्या कामगिरीची नोंद आयोजकांना पाठवणे आवश्यक असते. मात्र या आभासी स्पर्धेत सहभागी होताना अ‍ॅप बंद पडणे, इंटरनेटचा वेग कमी होणे, जीपीएस सिग्नल गायब होणे अशा तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

एक महिन्यापूर्वी बंगलोर व्हच्र्युअल मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या प्रणव महालेला अशाच तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. यात १० किलोमीटर अंतर पूर्ण करताना मध्येच ‘आदिदास रनिंग’ हे अ‍ॅप बंद पडले. त्यामुळे १४ किलोमीटरचे अंतर पूर्ण केल्यानंतरही अ‍ॅपमध्ये फक्त १० किलोमीटर अंतर धावल्याची नोंद झाली. परिणामी ४ किलोमीटर अंतर पार करण्यास दहा ते पंधरा मिनिटे जास्त लागली. ठरलेल्या वेळेत त्याला लक्ष्य पूर्ण करता आले नाही. मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी मी तीन महिन्यांपासून कसून सराव करत आहे. मध्येच अ‍ॅप बंद पडल्याने मी चार किलोमीटर जास्त धावलो. यामुळे मला निराशा आली आणि त्याचा परिणाम धावण्यावर झाल्याचे त्याने सांगितले.

मी सायकल चालवण्याच्या व्हच्र्युअल स्पर्धेत सहभागी झालो होतो. यात नेरळपासून आत गावात गेल्यावर मोबाइलला नेटवर्क नसल्याने इंटरनेट बंद झाले. परिणामी मी सायकल चालवलेल्या पाच किलोमीटर अंतराची नोंद स्त्रावा अ‍ॅपमध्ये झाली नाही. असे दोन वेळा झाल्याने या आभासी क्रीडा प्रकारात सहभागी न होण्याचे ठरवल्याचे सायकलपटू राहुल पाटील याने स्पष्ट केले.

नुकत्याच आभासी पद्धतीने पार पडलेल्या एयरटेल दिल्ली व्हच्र्युअल मॅरेथॉनमध्येही अनेक खेळाडूंना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. देशभरातील आघाडीच्या मॅरेथॉन स्पर्धाचे आयोजन करणाऱ्या प्रोकॅम इंटरनॅशनलला याबाबात विचारले असता, ‘सध्या करोनामुळे मॅरेथॉन स्पर्धा आभासी पद्धतीने होत असल्याने यात अ‍ॅपवरील कामगिरीची नोंद घेण्यात येते. खेळाडूंना अशा तांत्रिक अडचणी उद्भवण्याची शक्यता असते. यावर उपाय म्हणून योग्य इंटरनेटचा वेग असलेल्या परिसरात खेळाडूंनी धावावे. तसेच धावताना अ‍ॅप व्यवस्थित सुरू असल्याची काळजी घ्यावी.’

तांत्रिक अडचणी टाळण्यासाठीचे उपाय

१) आभासी क्रीडा प्रकारात सहभागी होताना शहराजवळील परिसरातच धावावे अथवा सायकल चालवावी.

२) एकाच वेळेस दोन अ‍ॅप वापरावे. एक अ‍ॅप मध्येच बंद पडल्यास दुसऱ्या अ‍ॅपवर कामगिरीची नोंद होते.

३) धावताना अ‍ॅपवर कामगिरीची नोंद होत असल्याची खात्री करावी.