मोदी यांच्या आवाहनाला नागरिकांचा प्रतिसाद

‘मला १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरील व्यासपीठावरून देशबांधवांशी संवाद साधण्याची संधी मिळते. मी जे बोलतो ते कोणा एका व्यक्तीचे भाषण नसून त्यात एक अब्ज २५ लाख देशवासीयांच्या भावना असतात. यावर्षी मी केवळ ३० ते ४० मिनिटे बोलणार असून यामध्ये मला थेट तुमच्या प्रश्नांवर बोलायचे आहे. यामुळे तुम्ही तुमचे काही मुद्दे मला सूचवा आणि २०२२चा नवीन भारताच्या निर्मितीमध्ये सहभागी व्हा.’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३० जुलै रोजी केलेल्या ‘मन की बात’मध्ये केले होते. त्याला प्रतिसाद देत आत्तापर्यंत साडेआठ हजारहून अधिक सूचनांचा पाऊस मोंदींच्या संकेतस्थळावर पडला आहे.

‘नरेंद्र मोदी अ‍ॅप’ आणि ‘माय गव्हर्नमेंट’ या संकेतस्थळावर नोंदणीकृत असलेल्या नागरिकांना ई-मेलद्वारे हे आवाहन करण्यात आले होत. याचबरोबर मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये त्याचा उल्लेख केल्यानंतर या अ‍ॅपवर आणि संकेतस्थळावर सूचनांचा पाऊस पडण्यास सुरुवात झाली. कोणी देशातील आरोग्य व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली आहे तर कोणी शिक्षणाबाबत चिंता व्यक्त करत असताना अनेकांनी सध्या देशातील अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरेही मागितली आहे.

कारभार सुधारण्याची अनेकांची मागणी

मोदी सरकार किती कार्यक्षम आहे सर्व काही ऑनलाइन केले आहे. पारदर्शक कारभार करण्याचा प्रयत्न आहे. हे सर्व खरे असले तरी सरकारी कामांना लागणारा वेळ काही कमी झालेला नाही. यावर भाष्य करत सरकारी अधिकाऱ्यांना समज द्यावी अशी विनंतीही या सूचनांमध्ये करण्यात आली आहे. तर काहींनी रेल्वे आणि वीज क्षेत्राचा कारभार सुधारावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

बायोमेट्रीक घोळामुळे नुकसान

देशातील चलनात एक हजार रुपयांची नोट येणार आहे की नाही. दोन हजाराची नोट रद्द होणार की नाही याबाबत खुलासा करण्याचेही सुचविले आहे. तर काहींनी आधार क्रमांक आणि बायोमेट्रीक घोळामुळे सामान्यांचे होत असलेल्या नुकसानाकडे लक्ष वेधण्याची सूचना केली आहे.