रेल्वेचे ओळखपत्र दाखवून तिकीट तपासनीस असल्याचे सांगत महाविद्यालयातील दोघांना लुटणाऱ्यास इतर प्रवाशांच्या सजगतेमुळे पकडण्यात रेल्वे पोलिसांना सोमवारी यश आले. यापैकी एक मध्य रेल्वेचा पॉइंट्समन असून तो आपल्या रेल्वे ओळखपत्राचा वापर प्रवाशांना लुबाडण्यासाठी करत होता. या रेल्वे कर्मचाऱ्याचा दुसरा साथीदार फरारी आहे.
अशोक पवार आणि कैलास चव्हाण हे दोघे महाविद्यालयीन विद्यार्थी जलद गाडीत घाईघाईत अपंगांसाठी राखीव असलेल्या डब्यात ठाणे येथे चढले. त्यांना अफजल कादर खान आणि महेश रहाटे यांनी तिकीट तपासनीस असल्याचे सांगून हटकले. रेल्वेचे ओळखपत्र दाखवून त्यांच्याकडून रोख पैसे काढून घेतले. पुढे अशोक आणि कैलास या दोघांना घाटकोपर स्थानकात उतरवून दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी प्रत्येकी एक हजार रुपयांची मागणी केली. मात्र दोघांनीही पैसे न दिल्याने या दुकलीने त्यांच्याकडून दोनशे रुपये उकळले. आजूबाजूच्या जागरूक प्रवाशांना ही गोष्ट खटकली व त्यापैकी काहींनी अफजल व महेश यांच्याकडे तिकीट तपासनीसाचे ओळखपत्र मागितले. त्या वेळी गांगरलेल्या या दोघांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलीस व प्रवाशांनी अफजलला पकडले. अफजल मध्य रेल्वेच्या जसई यार्ड येथील ऑपरेटिंग विभागात पॉइंट्समन म्हणून कार्यरत असल्याची माहिती कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी धुमाळ यांनी दिली.