गुन्ह्याचा तपास करणे हे एखादा गुंता सोडविण्यासारखेच असते, कधी कधी एक छोटेसे टोक हाताशी लागले की पूर्ण गुंता आपोआप उलगडत जातो. असाच काहीसा अनुभव चुनाभट्टी पोलिसांना आला. कुर्ला, कुरेशी नगर येथे संपूर्ण जळालेला एक मृतदेह सापडल्यानंतर त्याची ओळख पटविणेही दुरापास्त वाटत होते. पण शवविच्छेदनादरम्यान हाती लागलेली वरवर पाहता किरकोळ वाटणारी माहिती संपूर्ण गुन्हय़ाची कहाणी उलगडत गेली.

कुर्ला (पूर्व) येथील कुरेशी नगरमधील रेल्वे रुळांलगतच्या मदानात खेळणाऱ्या काही मुलांना रविवार १६ नोव्हेंबर २०१४ रोजी एक जळालेला मृतदेह नजरेस पडला. मुलांनी तातडीने पोलिसांना कळविल्यानंतर चुनाभट्टी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी हजर झाले. संपूर्ण जळालेल्या हा मृतदेह पुरुषाचा आहे की बाईचा हेही कळण्यापलीकडे गेले होते. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी शीव रुग्णालयात पाठवून दिला. पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक बाळासाहेब जाधव, निरीक्षक अनिल गािलदे, साहाय्यक निरीक्षक ए. बागडे यांनी आसपासच्या पोलीस ठाण्यांमध्ये कोणी महिला-पुरुष बेपत्ता आहे का याची माहिती घेण्यास सुरुवात केली.
शीव रुग्णालयातील शवविच्छेदन केंद्राचे प्रमुख डॉ. राजेश डेरे यांनी चुनाभट्टी पोलिसांना बोलावून घेतले. काही तरी महत्त्वाची माहिती शवविच्छेदनातून कळणार या आशेने पोलीस रुग्णालयात दाखल झाले. डॉ. डेरे यांनी पूर्ण मृतदेहाची कसून तपासणी केली. त्यानंतर त्यांनी दोन महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती सोपवले. ते म्हणजे, हा मृतदेह एका बाईचा असून तिच्या उजव्या पायावर हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या माहितीच्या आधारे शोध घेण्यास खूप वेळ लागेल, असा विचार पोलिसांच्या मनात आला. पण त्याचेही निराकरण झाले ते डॉ. डेरे यांनी दिलेल्या पुढच्या माहितीत, हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया ही सर्रास होत नाही, त्यामुळे त्यात वापरले जाणारे स्टीलच्या सळयांची रीतसर नोंदणी करूनच त्याचा व्यवहार केला जातो, कोणत्या रुग्णामध्ये कोणत्या क्रमांकाची सळई लावण्यात आली आहे, याची माहितीही विक्रेत्यांपासून डॉक्टरांकडे उपलब्ध असते. शवविच्छेदनातून मृतदेहाच्या कमेरला लावलेल्या सळईची निर्मिती करणारी संस्था आणि त्याचा क्रमांक डॉ. डेरे यांनी मिळवून दिला. पोलिसांचा मार्ग मग सुकर झाला.
पोलीस उपायुक्त (परिमंडळ-६) संग्रामसिंह निशाणदार यांनी पोलिसांची पथके तयार करून लवकरात लवकर या गुन्हय़ाचा छडा लावण्याचे आदेश दिले. पोलिसांच्या एका पथकाने माहिती काढली असता या सळईची विक्री काळबादेवी येथील दवाबाजार येथून झाल्याचे कळले. दवाबाजारमधील शेकडो दुकानांमध्ये चौकशी केल्यानंतर ही सळई गुजरातमधील एका कंपनीत तयार झाल्याचे कळाले. या कंपनीच्या मालकांशी पोलिसांनी संपर्क साधून गुन्हय़ाची उकल करण्यासाठी ही माहिती किती गरजेचे आहे हे पटवून सांगितले. त्यानुसार मालकांनी तातडीने ही सळई पनवेलमधील डॉ. संदीप निकम यांना पुरविल्याचे सांगितले. मृत महिला पनवेलच्या हद्दीतील असावी, असा काहीसा कयास पोलिसांनी लावला. त्यांनी डॉ. निकम यांची भेट घेतली, मात्र डॉ. निकम यांनी ही सळई कुर्ला नìसग होम चालविणाऱ्या डॉ. समीर शेख यांना पुरविल्याचे सांगितले. सळईचा प्रवास पाहून पोलीसही थक्क झाले. त्यांनी वेळ न दवडता डॉ. शेख यांची भेट घेतली. डॉ. शेख यांनी जुने दस्तावेज काढून या सळईविषयी माहिती शोधण्यास सुरुवात केली. त्या वेळी ही सळई फेब्रुवारी २०१३ रोजी हफिजा खातून या ६२ वर्षीय महिलेच्या उजव्या कमरेत लावण्यात आल्याचे सांगितले. कुल्र्यातील विनोबा भावे नगर परिसरात ही ज्येष्ठ महिला राहत असल्याचे कळल्यानंतर तपासपथकाचे संपूर्ण लक्ष या परिसरावर केंद्रित झाले. हफिजा खातून हिच्याविषयी माहिती काढली असता, ती १० नोव्हेंबरपासून बेपत्ता असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. भंगार वेचून विकणारी हफिजा एकटीच राहात असून तिला कोणीही वारस नसून तिचे कोणाशी भांडण-तंटा नसल्याचेही चौकशीत स्पष्ट झाले. मग, हफिजाला कोणी जाळले याचा उलगडा काही होईना, चौकशीत हफिजा हिचे जवळच आणखी एक घर असल्याचे पोलिसांना कळले. त्यांनी या घरात राहणाऱ्यांविषयी माहिती घेतली. तेव्हा भाडय़ाने राहणारा वाहिद शेख घरी नसल्याचे पोलिसांना कळले. आपली घरमालकीण आठवडाभर बेपत्ता असून त्याविषयी त्याने कुठेही चकार शब्द काढला नाही, पोलिसांकडे तक्रारही दिली नसल्याचे कळल्यानंतर पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
तपासाअंती वाहिद जळगावच्या चाळीसगाव येथे असल्याचे पोलिसांना कळले. पोलिसांचे एक पथक तातडीने चाळीसगावला रवाना झाले आणि त्यांनी वाहिदला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले. निरीक्षक जाधव, गािलदे यांनी वाहिदची चौकशी करण्यास सुरुवात केली. त्या वेळी आपण काहीच केले नाही, आपल्याला काहीच माहीत नाही असे वाहिद सांगू लागला. पण, पोलिसी खाक्या दाखवताच वाहिदने आपला गुन्हा कबूल केला. भाडय़ाने राहात असलेले एकमजली घर हफिजा यांनी आपल्याला विकावे यासाठी वाहिद आणि त्याचे काही मित्र तगादा लावून होते. मात्र, हफिजा त्यांना नकार देत होती. अखेर नोव्हेंबर ७ तारखेच्या रात्री त्यांनी हफिजा यांना या विषयावर चर्चा करण्यास घरी बोलावले. हफिजा घरी गेली असता, वाहिदने मित्रांच्या मदतीने तिचा गळा आवळून तिला ठार केले आणि त्यानंतर तिला जाळून तिचा मृतदेह नष्ट करण्याचा प्रयत्न केला. एकाकी असलेल्या हफिजाच्या मृत्यूचे कोडे उलगडूच शकणार नाही, असा विश्वास वाहिदला वाटत होता. हा मृत्यू पचला तर दोन्ही घरे आपल्याच नावावर होतील अशा भ्रमात होता, परंतु मृतदेह सापडल्यापासून अवघ्या तीन दिवसांत तपासचक्र फिरले आणि वरवर पाहता कुठलाच सुगावा नसताना गूढ वाटणारा गुन्हा उलगडला.