26 September 2020

News Flash

क्रीडा विद्यापीठाची गरज

उत्तर प्रदेशसारख्या राज्यामध्ये क्रीडा विद्यापीठ आहे.

‘बदलता महाराष्ट्र’चे उद्घाटन गुरुवारी प्रवीण अमरे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

‘बदलता महाराष्ट्र’कार्यक्रमात क्रिकेटपटू प्रवीण अमरे यांचे मत

‘‘उत्तर प्रदेशसारख्या राज्यामध्ये क्रीडा विद्यापीठ आहे. देशाचा उत्तम फलंदाज सुरेश रैना याच क्रीडा विद्यापीठातून घडला आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जशी वैद्यकीय, अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत, त्याच धर्तीवर क्रीडा विद्यापीठाचीही गरज आहे. या क्रीडा विद्यापीठामध्ये खेळाबाबतचे सर्व ज्ञान मिळेल आणि देशासाठी खेळाडू घडवता येतील. आता ती वेळ आली आहे. याबाबत सरकारने विचार करायला हवा,’’ असे मत माजी क्रिकेटपटू आणि माजी प्रशिक्षक प्रवीण अमरे यांनी गुरुवारी व्यक्त केले. ब्राझीलमध्ये रंगणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेचे औचित्य साधून ‘लोकसत्ता’च्या ‘बदलता महाराष्ट्र’ या वार्षिक उपक्रमात ‘क्रीडासंस्कृती : आज आणि उद्या’ या परिसंवादाचे उद्घाटन करताना ते बोलत होते.

टीजेएसबी सहकारी बँक प्रस्तुत, एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लि. सहप्रायोजित या कार्यक्रमाला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे विशेष सहकार्य लाभले आहे.

उद्या, शुक्रवारी या परिसंवादाच्या समारोप कार्यक्रमात क्रीडामंत्री विनोद तावडे यांचा प्रमुख सहभाग राहाणार आहे. गुरुवारच्या परिसंवादात देशाच्या क्रीडा संस्कृतीचा वेध घेताना मान्यवरांनी खेळाडूंची जडणघडण, खेळातली व्यावसायिकता, विविध लीगचा खेळांवर झालेला सकारात्मक बदल, यावर आपली मते व्यक्त केली. यामध्ये खेळाडूंनी नोकरीवर फक्त अवलंबून न राहता देशासाठी खेळण्याचा विचार करावा, हा मुद्दा अधोरेखित केला गेला. क्रीडासंस्कृती बदलायची असेल तर मानसिकता बदलायला हवी आणि नवे बदल स्वीकारायला हवेत, यावरही विचारमंथन झाले.

कपिल आणि विश्वचषक ही प्रेरणा..

‘‘भारताने १९८३ साली विश्वचषक जिंकला. त्यानंतर मुंबईत विजेत्या संघाची मिरवणूक काढली गेली. शिवाजी पार्क येथे मी ती मिरवणूक पाहण्यासाठी उभा होतो. त्या वेळी फक्त एका सेकंदामध्ये मला कपिलदेव विश्वचषकाबरोबर दिसले. माझ्यासाठी तोच क्षण क्रिकेटपटू म्हणून कारकीर्द घडवण्यासाठी प्रेरणादायी ठरला.

१९८३ साली मी विश्वविजय पाहिला आणि १९९२ च्या विश्वचषकामध्ये त्याच कपिलदेव यांच्याबरोबर मला विश्वचषकात खेळण्याची संधी मिळाली,’’ असे अमरे यांनी सांगितले.

बदलाची सवय करायला हवी..

रवी शास्त्री आणि सौरव गांगुली यांच्यात सध्या झडत असलेल्या वादाबद्दल विचारता अमरे म्हणाले की, ‘‘या गोष्टीलाच बदलती क्रीडासंस्कृती असे आपण म्हणू शकतो! बीसीसीआयने पहिल्यांदाच बदल केला की त्यांनी प्रशिक्षक पदासाठी अर्ज मागवले. त्यांची छाननी केली गेली. माझ्या मते बदल म्हणजे या गोष्टी होणारच. पूर्वी फक्त या बाबतचा समितीच निर्णय घ्यायची. तुम्हालाही या बदलाची सवय करावी लागेल.’’

१५ सेकंदांसाठी पंधरा वर्षांची मेहनत

‘‘आपण देशासाठी खेळावे, असे प्रत्येक मुलाला वाटायला हवे. आपण ऑलिम्पिकमध्ये पदक विजेते पाहतो. त्या खेळाडूंच्या यशामागे बरेच जण पाठीशी असतात. त्यांची अथक कष्ट करण्याची तयारी असते. १५ सेकंदांचे यश मिळवायला १५ वर्षांची मेहनत लागते! तेवढी तयारी आपलीही असेल तर क्रीडासंस्कृती बदलेल. दहा वर्षांनी आपल्या देशात क्रीडासंस्कृती आहे का, हा प्रश्न विचारला जाऊ नये,’’ असे अमरे या वेळी म्हणाले.

क्रीडामंत्री तावडे यांच्या उपस्थितीत आज समारोप

राज्याचे शिक्षण व क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या भाषणाने आज या उपक्रमाचा समारोप होईल. यावेळी ज्येष्ठ बुद्धिबळपटू रघुनंदन गोखले उपस्थित असतील. तावडे यांच्या हस्ते ‘बदलता महाराष्ट्र’च्या ‘कर्ती आणि करविती’ या पुस्तिकेचे प्रकाशन होईल.

पालकांनी मुलावर विश्वास ठेवायला हवा!

‘‘सचिन तेंडुलकर घडला म्हणून आपल्या मुलालाही तसेच बनवण्याचा प्रयत्न करू नये. प्रत्येक पालकाने मुलांना खेळाचा आनंद घेऊ द्यावा. शारदाश्रम शाळेमध्ये आल्यावर पहिली ३-४ वर्षे माझ्याकडून एकही शतक झाले नाही. त्या वेळी माझ्या आई-बाबांनी मला पाठिंबा दिला नसता तर मी खेळाडू म्हणून घडलो नसतो,’’ असे अमरे यांनी सांगितले.

प्रवीणचे आजोबा क्रीडापटू होते. पण व्यवसायाची जबाबदारी माझ्यावर आल्याने मला खेळता आले नाही. प्रवीणला मात्र मनमुरादपणे खेळाचा आनंद लुटू द्यायचा, हे मी मनोमन ठरवले होते. त्यामुळे त्याच्या अपयशामुळे आम्ही डगमगलो नाही. त्याला प्रत्येक वेळी पाठिंबा दिला. त्यानंतर जेव्हा तो देशासाठी खेळला तेव्हाचा आनंद शब्दांत व्यक्त करता येणार नाही.

– कल्याण अमरे, प्रवीण यांचे वडील़

 

आजचे परिसंवाद

विषय : खेळाची नशा आणि नशेचा खेळ

सहभाग : तंदुरुस्तीतज्ज्ञ शैलेश परुळेकर, पॉवरलिफ्टिंग संघटक संजय सरदेसाई, क्रीडा वैद्यकतज्ज्ञ डॉ. निखिल लाटय़े.

 

विषय : खेळ, व्यवस्थापन आणि करिअर

सहभाग : क्रिकेटपटू नीलेश कुलकर्णी, कॅरमपटू अरुण केदार, ज्येष्ठ पत्रकार वि. वि. करमरकर.

 

विषय : खेळ, संस्कार आणि संस्कृती

सहभाग : कुस्तीपटू नरसिंग यादवचे बंधू विनोद कुमार, क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड, बुद्धिबळतज्ज्ञ प्रवीण ठिपसे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2016 2:44 am

Web Title: pravin amre in loksatta badalta maharashtra
Next Stories
1 बेकायदा बांधकामांना वाव मिळत असल्याने मुंबईची ‘अग्निपरीक्षा’
2 ‘ब्लॉग बेंचर्स’चा नवा विषय ‘अंतारंभ’
3 ‘एमफार्म’ अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीत सावळागोंधळ!
Just Now!
X