आरटीपीसीआर चाचण्यांतील निदानासाठी दोन दिवसांची प्रतीक्षा; रुग्णांवर उपचार सुरू करण्यास उशीर

मुंबई : करोनाबाधितांचे अहवाल २४ तासांत देण्याचे आदेश पालिकेने दिले असले तरी काही खासगी प्रयोगशाळा आरटीपीसीआर चाचण्यांचे अहवाल दोन दिवसांनंतर देत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे रुग्णांना उपचार सुरू करण्यासही उशीर होत असल्याचे आढळले आहे.

करोनाचे निदान करण्यासाठी आरटीपीसीआर ही प्रमाणित चाचणी मानली जाते. एप्रिलमध्ये रुग्णसंख्या वाढल्याने प्रयोगशाळांवरील कामाचा भारदेखील वाढला. त्यामुळे रुग्णांचे चाचणी अहवाल उशिराने मिळत होते. अहवाल न आल्यामुळे रुग्णांना लक्षणे असूनही रुग्णालयात दाखल केले जात नव्हते. त्यामुळे उपचार सुरू होण्यास उशीर होत होता. रुग्णांचे अहवाल २४ तासांत देण्याचे आदेश पालिकेने सर्व प्रयोगशाळांना दिल्यानंतर बहुतांश प्रयोगशाळांचे अहवाल २४ तासांच्या आत दिले जात असले तरी अजूनही चार ते पाच खासगी प्रयोगशाळा अहवाल उशिरा देत असल्याचे आढळले आहे.

आमच्याकडे असलेल्या दोन खासगी प्रयोगशाळांचे अहवाल अजूनही दोन दिवसांनी येतात. पालिकेने आदेश दिले आहेत. परंतु प्रयोगशाळांकडून याचे पालन केले जात नाही. त्यामुळे रुग्णांनाही उपचार सुरू करण्यात अडचणी येतात, असे विभागीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. पालिकेच्या मोठ्या करोना रुग्णालयांनाही सेवा पुरविणाऱ्या खासगी प्रयोगशाळांमधून अहवाल दोन दिवसांनी दिले जात आहेत. त्यामुळे रुग्ण बाधित आहे की नाही याबाबत माहिती वेळेत मिळत नाही, अशी माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली.

२६ दिवसांनी अहवाल

मुंबईत खासगी आणि सरकारी अशा जवळपास ५० प्रयोगशाळा कार्यरत आहेत. १ आणि २ मेच्या आकडेवारीनुसार यातील बहुतांश प्रयोगशाळांचे अहवाल २४ तासांत मिळत आहेत. परंतु मेट्रोपोलिस, एसआरएल, अपूर्वा डायग्नोस्टिक हेल्थकेअर, वेलस्प्रिंग हेल्थकेअर यांसह आणखी काही खासगी प्रयोगशाळांचे अहवाल मात्र वेळेत मिळत नसल्याचे दिसत आहे.  भाईंदर येथील अपूर्वा डायग्नोस्टिक हेल्थकेअर प्रयोगशाळेतून तर आरटीपीसीआर चाचण्यांचे अहवाल २ मे रोजी तब्बल २६ दिवसांनी आले आहेत, तर १ मे रोजी आलेले अहवाल २२ दिवसांनी आले होते. जोगेश्वारी येथील वेलस्प्रिंग हेल्थेकेअर प्रयोगशाळेबाबतची हीच स्थिती आहे. या प्रयोगशाळेतील २ मे रोजी आलेले अहवाल ३२२ तासांनी म्हणजे १३ दिवसांनी आले होते. तर १ मेला आलेले अहवाल ३३७ तास म्हणजेच १४ दिवसांनी आले होते. मेट्रोपोलिस खासगी प्रयोगशाळा असून मुंबईतील बहुतांश भागांमध्ये चाचण्या याच प्रयोगशाळेमार्फत केल्या जातात. १ मे ला या प्रयोगशाळेचे अहवाल ३८९ तास १६ दिवसांनी पालिकेला मिळाले आहेत, तर तर २ मे ला १४४ तासांनी म्हणजेच ६ दिवसांनी प्राप्त झाले आहेत. यातील एसआरएल प्रयोगशाळेचे अहवाल ५० तासांनी म्हणजे दोन दिवसांनी पालिकेला दिले जात आहेत. याबाबत सर्व खासगी प्रयोगशाळांशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु संपर्क होऊ शकलेला नाही.

अहवाल उशिरा पाठविणाऱ्या खासगी प्रयोगशाळांवर पालिकेने मात्र कोणतीही कारवाई केलेली नाही. यासंबंधी पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी यासंबंधी आणखी माहिती घेतली जाईल, असे सांगितले.

आमच्याकडून वेळेत अहवाल पाठविले जात असून कोणतेही अहवाल उशीराने पाठविलेले नाहीत, असे मेट्रोपोलिस हेल्थकेअरने अधिकृतरित्या सांगितले आहे.

निदानासाठी सीटी स्कॅनवर भर

आरटीपीसीआर चाचण्यांचे अहवाल वेळेत मिळत नसल्याने रुग्ण सीटी स्कॅनकडे धाव घेत आहेत. लक्षणे असल्यास रुग्ण अहवाल येण्याची फार काळ वाट पाहण्याच्या मन:स्थितीत नसतात. तातडीने उपचार सुरू करण्यासाठी मग सीटी स्कॅन करण्याकडे रुग्णांचा कल वाढत आहे, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.