नमिता धुरी

साहित्य फराळाची शतकी परंपरा सांगणाऱ्या दिवाळी अंकांकडे जाहिरातदारांनी पाठ फिरवली आहे. टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर ही स्थिती अपेक्षित असूनही केवळ परंपरा खंडित न करण्याच्या हेतूने प्रकाशकांनी दिवाळी अंकांची निर्मिती केली आहे.

दिवाळी अंकांना बँकांच्या जाहिराती यंदा मिळालेल्या नाहीत. टाळेबंदीत बरेच नुकसान सोसल्याने खासगी कंपन्यांनीही हात आखडता घेतला. दिवाळी अंकांच्या संपादकांना स्नेहसंबंधांतून मिळालेल्या जाहिरातींवरच अवलंबून राहावे लागले आहे. विक्रेत्यांकडून होणाऱ्या विक्रीवर अवलंबून राहता येणार नसल्याने प्रकाशकांनी एकत्र येऊन दिवाळी अंकांचा संच सवलतीत विकण्याचा मार्ग निवडला आहे.

‘दिवाळी अंकाचे नियोजन जूनपासून सुरू होते. त्यामुळे जाहिराती मिळाल्या किंवा नाही मिळाल्या तरी पानांची संख्या कमी होत नाही. गेली कित्येक वर्षे ही परंपरा सुरू असल्याने अंक वेळेत मिळतील, असा वाचकांना विश्वास असतो’, असे ‘दीपावली’ अंकाचे संपादक अशोक कोठावळे म्हणाले.

‘अंक काढायचा नाही असे आधी ठरले होते. काही लेखकांनी मानधन घेणार नसल्याचे सांगितले आहे’, अशी माहिती ‘शब्दालय’च्या संपादिका सुमती लांडे यांनी दिली.

‘जाहिरातींमध्ये घट झाली असल्याने उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळे निम्मेच दिवाळी अंक निघतील, असे ‘शब्द रुची’चे आल्हाद गोडबोले यांनी सांगितले.

शेवटचा अंक

‘साहित्यिक अभिरुची निर्माण होण्यासाठी आवश्यक असलेले भाषाप्रभुत्व सध्याच्या इंग्रजी माध्यमात शिकलेल्या पिढीकडे नाही. त्यांना उच्च दर्जाच्या मराठी साहित्याचा आस्वाद घेता येत नाही. चांगले वाचले जात नाही. परिणामी, दिवाळी अंकांना एरवीही अर्थबळ कमीच असते. त्यामुळे यंदाचा अंक शेवटचा असेल’, असे ‘अंतर्नाद’चे संपादक भानू काळे यांनी सांगितले.

‘स्टोरीटेल’वर अंक

परदेशी वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी ‘स्टोरीटेल’वर श्राव्य दिवाळी अंक आणल्याची माहिती ‘मौज’चे श्रीकांत भागवत यांनी दिली. त्यासाठी प्रसिद्ध कलाकारांनी अंकातील साहित्य वाचन केले आहे.