इंदिरा गांधी विकास आणि संशोधन संस्थेचे संचालक प्रा. दिलीप नाचणे यांची अर्थशास्त्राविषयक संशोधन आणि अध्यापनातील असामान्य कामगिरी लक्षात घेऊन, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेवर नियुक्ती करण्यात आली आहे. देशासमोरील आर्थिक आव्हानांचा नियतकालिक वेध घेऊन, पंतप्रधानांना सुयोग्य आर्थिक धोरणांविषयक सल्ला देणाऱ्या या प्रतिष्ठित मंडळावरील सदस्याला केंद्रातील राज्यमंत्र्याचा दर्जा असतो.
भारतीय रिझव्‍‌र्ह बँक तसेच  भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या अनेक अर्थविषयक कार्यदल आणि समित्यांमध्ये सक्रिय सहभाग राहिलेले प्रा. नाचणे हे १९९३ ते १९९९ या काळात मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे संचालक आणि अनेकांगाने विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून सुपरिचित आहेत. अनेक कंपन्या आणि संस्थांच्या संचालक मंडळ आणि कार्यकारी मंडळावर ते कार्यरत राहिले असले तरी, आर्थिक शिक्षण आणि संशोधनात त्यांचे भरीव योगदान राहिले आहे.
१९७८ ते २००३ अशा प्रदीर्घ कारकीर्दीत प्रा. नाचणे यांनी विविध १३ देशी-विदेशी विद्यापीठांमध्ये अध्यापनाचे कार्य केले आहे. सध्या अमेरिकेत चर्चा-परिषदांमध्ये व्याख्यानासाठी ते दौऱ्यावर असतानाच, या प्रतिष्ठित नियुक्तीची हे वृत्त आले आहे.
सुवर्णपदकासह एम. ए. (अर्थशास्त्र) आणि एम.ए. (गणित) विषयातून पदवी मिळविल्यानंतर, ‘थिअरी ऑफ ऑप्टिमल इकॉनॉमिक ग्रोथ’ या अर्थशास्त्रातील प्रबंधासाठी १९७३ साली मुंबई विद्यापीठाने प्रा. नाचणे यांना पीएचडी पदवी बहाल केली. अर्थशास्त्रावरील त्यांचे विविध आठ ग्रंथ आणि शेकडो शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. ‘जर्नल ऑफ क्वांटिटेटिव्ह इकॉनॉमिक्स’ तसेच ‘मॅक्रोइकॉनॉमिक्स अ‍ॅण्ड फायनान्स इन इमर्जिग मार्केट’ या नियतकालिकांचे संपादक म्हणूनही ते कार्यरत आहेत.