राज्यात वाढत्या जातीय हिंसाचाराच्या विरोधात शनिवारी विविध सामाजिक संघटनांच्या वतीने दादर येथे मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रीय एकता मंचाचे अध्यक्ष खासदार हुसेन दलवाई व मधु मोहिते यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या िहसाचारविरोधी निर्धार मोर्चात सामाजिक कार्यकर्ते, कलावंत, लेखक, माहिला, विद्यार्थी, प्राध्यपक, सरकारी कर्मचारी, मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडा येथील तिहेरी दलित हत्याकांडाचा निषेध म्हणून हा मोर्चा काढण्यात आला होता. दादर येथील राजा बडे चौकातून सेनाभवन, प्लाझा, रानडे रोड असा मोर्चा आला. सेनापती बापट यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर चैत्यभूमीवर मोर्चा गेला. तिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्तुपाला अभिवादन करण्यात आले. पुढे शिवाजी पार्कवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करुन बालमोहन शाळेजवळील चौकात मोर्चाचे छोटय़ा सभेत रुपांतर झाले. त्यावेळी भारतीय संविधानांने बहाल केलेल्या मूलभूत अधिकाराच्या रक्षणासाठी कटीबद्ध होण्याची व राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात आली.
या मोर्चात सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अतुल परचुरे, साहित्यिक रत्नाकर मतकरी, मीना नाईक, अरुण नाईक, जयंत पवार, नाटय़ दिग्दर्शक विजय केंकरे, सुभाष अवचट, मनवा नाईक, प्रा. सुशिला मोराळे, शैला सातपुते, यांच्यासह विद्यार्थी, प्राध्यपक, सरकारी कर्मचारी, महिला, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते मोठय़ा संख्यने सहभागी झाले होते.