पूर्व मुक्त मार्गावरील अपघात प्रकरणातील आरोपी जान्हवी गडकरसोबत आयरिश हाऊस पबमध्ये मद्यपान करणारा बहुराष्ट्रीय कंपनीचा ‘तो’ अधिकारी आता पोलिसांचा प्रमुख साक्षीदार बनला आहे. पोलिसांनी त्याचा जबाब नोंदविला असून जान्हवीने आपल्या सोबत मद्यपान केल्याची कबुली त्याने दिली असून पोलिसांसाठी साक्ष देण्यास तो तयार झाला आहे.
पंचतारांकित हॉटेलातून रात्री १० वाजता बाहेर पडल्यानंतर ती काळाघोडा येथील आयरिश हाऊस या पबमध्ये गेली होती. या ठिकाणी तिला तिच्या कंपनीतील एक बडा अधिकारी भेटला होता. या ठिकाणी त्यांनी दीड तास घालवले आणि चार जार बीअर घेतल्या. त्याचे बिल पाच हजार ७०० रुपये झाले होते. या वेळी जान्हवीला शुद्ध नव्हती. यामुळे तोल जाऊन ती पबमध्येच कोसळली होती.
जान्हवीच्या मित्राने दिलेल्या जबाबानुसार रात्री दहानंतर त्यांचे फोनवर संभाषण झाले. कामानिमित्ताने काळा घोडाच्या आयरिश पबमध्ये त्यांची भेट पूर्वनियोजित होती, पण मद्यपान करण्याचे कसलेच प्रयोजन नव्हते, असे त्याने सांगितले. आमची भेट ही व्यावसायिक असल्याचा दावा त्याने केला, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. अधिकाऱ्याला महत्त्वाचा साक्षीदार (स्टार विटनेस) बनवले आहे, अशी माहिती आरसीएफ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप राऊत यांनी दिली.
या प्रकरणात आतापर्यंत एकूण १५पेक्षा अधिक साक्षीदार झाले आहेत. पण मृत साबूवाला यांचा मुलगा नोमेन, अपघात प्रत्यक्ष पाहणारा गोवंडीचा टॅक्सीचालक आणि हा अधिकारी या प्रकरणातले प्रमुख साक्षीदार ठरणार आहेत.
..तर दुर्घटना टळली असती
याबाबत एका अधिकाऱ्याने सांगितले, आयरिश पबमध्ये ती आपल्या अधिकारी मित्रासोबत आली होती. ती पूर्णपणे मद्याच्या अमलाखाली होती. पबमध्येच ती कोसळली होती. या अधिकाऱ्याने तिला उचलले. ती पूर्णपणे शुद्धीत नसताना त्याने तिला एकटीला घरी पाठवायला नको होते. त्याने तिला थांबवले असते, तर ही दुर्घटना घडली नसती.
आयरिश पबमध्ये जान्हवी ज्या अधिकाऱ्यासोबत मद्यपान करायला गेली तो बहुराष्ट्रीय कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी आहे. सुरुवातीला तिने केवळ मरिन ड्राइव्ह जाऊन दोन तास गाणी ऐकल्याचे खोटे सांगितले होते. परंतु योगायोगाने एका इंग्रजी पत्रकाराने जान्हवीला या पबमध्ये पाहिले आणि िबग फुटले. जान्हवीला या अधिकाऱ्याला अडचणीत आणण्याची इच्छा नसावी किंवा त्यांचे संबंध जगजाहीर होऊ नये अशी तिची इच्छा असावी, अशीही शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.
जामीन अर्जाची सुनावणी लांबणीवर
मुंबई: जान्हवी गडकरच्या जामीन अर्जावरची सुनावणी १७ जूनपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. सोमवारी तिच्या वकिलांनी वैद्यकीय उपचारांचे कारण देत जामीन देण्याची मागणी केली होती; मात्र आता भायखळा तुरुंगातून तिचा वैद्यकीय अहवाल आल्यानंतर यावरील सुनावणी होणार आहे. कुर्ला महानगर दंडाधिकारी न्यायालयात जान्हवीच्या वकिलांनी जामिनासाठी विनंती अर्ज केला होता. जान्हवीच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याने जामीन मंजूर करण्याची मागणी केली होती. मात्र वैद्यकीय अहवाल सादर करण्यास न्यायालयाने सांगितले. भायखळा तुरुंगातून तिचा वैद्यकीय अहवाल येईपर्यंत म्हणजे १७ जूनपर्यंत ही जामीन अर्जाची सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी तिच्या जामीन अर्जाला हरकत घेणारा अर्ज न्यायालयात सादर केला. जान्हवी जामिनावर बाहेर आल्यास असा गुन्हा पुन्हा करू शकते, तसेच तपास अजून पूर्ण व्हायचा असल्याने तिला जामीन देऊ नये, असे पोलिसांच्या वतीने न्यायालयासमोर सांगण्यात आले.