अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच विरोधकांनी दुष्काळ, चारा प्रश्नासह  इतर मुद्दय़ांवर सत्ताधारी कॉंग्रेस- राष्ट्रवादीची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. अधिवेशनादरम्यान, विरोधकांमधील गटबाजी उघडकीस आल्यामुळे निर्धास्त झालेल्या सत्ताधारी पक्षांनाच आता स्वकीय आमदारांच्या नाराजीला सामोरे जावे लागत आहे. राष्ट्रवादीच्या आमदाराने थेट मुख्यमंत्र्यांवरच हक्कभंगाची सूचना मांडून सत्ताधाऱ्यांमध्येच तू तू मै मै सुरू असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांच्या विरोधापेक्षा  स्वपक्षीय आमदार आणि मंत्र्यांच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची भीती सरकारसमोर उभी टाकली आहे.
मराठा आरक्षण आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारक याबाबत दिलेल्या आश्वासनांची शासनाने पूर्तता न केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विनायक मेटे यांनी आक्रमक भूमिका घेत थेट मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरुध्द विशेष हक्कभंगाची सूचना दिली आहे.
हक्कभंगाचा उल्लेख करताच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि भाई जगताप यांच्याशी मेटे यांची शाब्दिक चकमकही विधानपरिषदेत झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी मेटे यांची पाठराखण केली असून काँग्रेसने समन्वय समितीची बैठक का बोलाविली नाही, असा सवाल केला आहे.
मराठा समाजाचा समावेश ओबीसीमध्ये करून २५ टक्के आरक्षण मिळावे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अरबी समुद्रात उभे करण्यासंदर्भात २० डिसेंबर २०१२ रोजी नागपूरला विधानपरिषद सभापती, विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अन्य संबंधितांची बैठक झाली. शिवाजी महाराज स्मारकासंदर्भात ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून दोन महिन्यात अहवाल सादर करावा आणि मराठा आरक्षणाबाबत उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ३ महिन्यांत अहवाल द्यावा, असा निर्णय घेण्यात आला होता. पण अजून काहीच कार्यवाही शासनाकडून करण्यात आलेली नाही.
त्यामुळे हा सभापती व सभागृहाचा अवमान असल्याचे मेटे यांचे म्हणणे आहे. त्यांनी ही सूचना विधिमंडळ कार्यालयात दाखल केली. विधानपरिषदेत याचा उल्लेख करताच त्यांच्याजवळच बसलेले माणिकराव ठाकरे व भाई जगताप यांनी काही टिप्पणी केली. त्याला मेटे यांनी प्रत्युत्तर दिले. ‘ही कामकाजाची पद्धत नाही. तुम्ही आपसांत बोलायचे आणि मी सभागृह चालवायचे, हे बरोबर नाही, असे सभापती शिवाजीराव देशमुख यांनी मेटे यांना सुनावले. ते यावर चिडले असताना तुमच्या हक्कभंग सूचनेबाबत बुधवारी निर्णय दिला जाईल, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.