अन्य राज्यांमधून होणाऱ्या स्थलांतरावरून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी नवी दिल्लीत झालेल्या जाहीर सभेत शिवसेनेला लक्ष्य केले असले तरी गेले काही वर्षे या मुद्दय़ावर आक्रमक भूमिका घेणाऱ्या मनसेचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळला का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कारण राज्यात काँग्रेसला यश मिळवून देण्यात मनसे हा महत्त्वाचा घटक असल्यानेच मनसेचा उल्लेख टाळला असावा, अशी शक्यता आहे.
महाराष्ट्रात परप्रांतीयांना त्रास दिला जातो व त्यासाठी भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचा पुढाकार असतो, असे राहुल गांधी यांनी दिल्ली निवडणूक प्रचारात बोलताना सांगितले. परप्रांतीयांवरून राहुल गांधी यांनी शिवसेनेवर टीकाही केली. शिवसेनेने १९७०च्या दशकात परप्रांतीय व विशेषत: दाक्षिणात्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. पुढे शिवसेनेने हिंदुत्वाचा पुरस्कार केल्यावर शिवसेनेचा प्रांतीयवाद काहीसा मावळला होता. उलट गेल्या पाच-सात वर्षांत महाराष्ट्रात राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी टॅक्सीचालक आणि फेरीवाल्यांना चोप दिल्यावर त्याची राष्ट्रीय पातळीवर प्रतिक्रिया उमटली होती. परप्रांतीयांच्या मुद्दय़ावर नेहमीच राज ठाकरे यांच्यावर राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांकडून टीका केली जाते. असे असले तरी राहुल गांधी यांनी दिल्लीतील परप्रांतीय मतदारांना आपलेसे करण्याकरिता शिवसेनेवर टीका केली.

शिवतीर्थावर काँग्रेसची अनुपस्थिती
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त शिवसेनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात शरद पवार हे उपस्थित राहिले असले तरी शिवसेनेबरोबर मधुर संबंध असलेले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाण्याचे टाळले. नेमके त्याच दिवशी राहुल गांधी यांनी शिवसेनेला लक्ष्य केल्याने काँग्रेस नेत्यांचा निर्णय योग्यच ठरला.

काँग्रेससाठी मनसे महत्त्वाचा!
गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मनसेच्या प्रभावामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचा फायदा झाला होता. या वेळी नरेंद्र मोदी यांच्यामुळे राज ठाकरे हे महायुतीबरोबर जाण्याची शक्यता वर्तविली जात होती, पण उद्धव ठाकरे यांच्या ठाम विरोधाने भाजपने हा नाद सोडून दिला. राज ठाकरे कोणती भूमिका घेतात यावरच काँग्रेस-राष्ट्रवादीचे मतांचे गणित अवलंबून आहे. राज ठाकरे यांच्यामुळे तिरंगी लढत झाल्यास ती काँग्रेससाठी फायदेशीर ठरणार आहे. मध्यंतरी राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेताना मनसेचा उल्लेख झाला होता. मनसे कोणती भूमिका घेते यावर काँग्रेस-राष्ट्रवादीचे बारीक लक्ष आहे. ही पाश्र्वभूमी लक्षात घेताच राहुल गांधी यांनी परप्रांतीयांच्या मुद्दय़ावरून राज ठाकरे किंवा मनसेचा उल्लेख टाळलेला असावा, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जातो. दिल्लीत काँग्रेसच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी काही वर्षांपूर्वी स्थलांतरितांच्या विरोधात भूमिका घेतली होती. यामुळेच या मतदारांना चुचकारण्याकरिता राहुल गांधी यांनी मुद्दामहून महाराष्ट्र आणि कर्नाटकचा उल्लेख केला. हे करताना भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेवर निशाणा साधला.