मध्य प्रदेशातील खंडवा आणि इटारसी या दोन स्थानकांदरम्यान असलेल्या हरदा येथे झालेला विचित्र अपघात हवामान खात्याच्या अंदाजाकडे दुर्लक्ष केल्यानेच झाला, असा तर्क मांडण्यात येत आहे. संबधित भागात अतिवृष्टीची सूचना आणि धोक्याचा इशारा हवामान खात्याने रेल्वेला दिला होता. मात्र अधिकाऱ्यांनी त्याची दखल न घेतल्याने ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे.
ईशान्य-पूर्व आणि मध्य भारतात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे मध्य प्रदेशातील काही नद्यांनी धोकादायक पातळी ओलांडली आहे. मध्य प्रदेशातील माचक नदीनेही धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर हवामान खात्याने अतिवृष्टीचा आणि धोक्याचा इशारा रेल्वे प्रशासनाला दिला होता, असे सूत्रांकडून समजते. मात्र रेल्वेच्या पश्चिम-मध्य विभागातील अधिकाऱ्यांनी या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्याचा तर्क व्यक्त होत आहे. मुसळधार पाऊस, धोक्याची पातळी ओलांडून वाहणारी नदी आणि रात्रीची वेळ यामुळे हा अपघात झाल्यानंतर मदतकार्य करणेही कठीण झाले होते.
आगीनंतर आता पाऊस
मध्य प्रदेशात इटारसी येथील रूट रिले केबिनमध्ये (सिग्नल यंत्रणा कक्ष) लागलेल्या आगीमुळे रेल्वेचे तब्बल १२०० कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. या आगीमुळे तब्बल महिनाभर वाहतूक विस्कळीत झाली होती. ही सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होऊन काहीच दिवस उलटले होते. तेवढय़ात आता या पावसाने थैमान मांडल्याने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
१९ गाडय़ा रद्द
दरम्यान, या अपघातामुळे मुंबईहून सुटणाऱ्या आणि मुंबईला येणाऱ्या गाडय़ांच्या वाहतुकीला फटका बसला. आतापर्यंत मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणाऱ्या १९ गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात मंगला, लक्षद्वीप एक्स्प्रेस, अजमेर-हैदराबाद एक्स्प्रेस, एलटीटी-लखनऊ सुपरफास्ट एक्स्प्रेस, एलटीटी-राजेंद्रनगर एक्स्प्रेस, कामायनी एक्स्प्रेस, एलटीटी-हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस यांचा समावेश आहे. तर तब्बल ३५ गाडय़ांच्या मार्गामध्ये बदल झाले आहेत. परिणामी, प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.