पश्चिम रेल्वेच्या नायगाव स्थानकात शनिवारी सकाळी प्रवाशांनी रेलरोको आंदोलन सुरू केल्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. मात्र, काही वेळापूर्वीच रेल्वे पोलिसांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे प्रवाशांनी आपले आंदोलन मागे घेतले. परंतु, तासभर सुरू असलेल्या या गोंधळामुळे विरारहून चर्चगेटच्या दिशेने येणारी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. आता ही वाहतूक पुन्हा सुरू झाली असली तरी ती पूर्ववत होण्यास आणखी काही कालावधी लागण्याची शक्यता आहे.

पश्चिम रेल्वेने आजपासून जुनं वेळापत्रक रद्द करून नवीन वेळापत्रक लागू केलं आहे. या वेळापत्रकानुसार नायगाव स्थानकातून सकाळी ७.५० ला सुटणारी वसई-अंधेरी लोकल ऐन वेळेस रद्द करण्यात आली होती. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना तशी कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. नायगाव स्थानकावर आल्यानंतर प्रवाशांना ही ट्रेन रद्द झाल्याचे कळले. या प्रकारामुळे त्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. त्यांनी थेट रूळांवर उतरत रेलरोको आंदोलन करण्यास सुरूवात केली. प्रवाश्यांनी रेल्वे रूळावर ठाण मांडून रेल्वे प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे सध्या विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली. या गोंधळामुळे कामावर जाण्यासाठी निघालेल्या चाकरमन्यांना त्रास सहन करावा लागला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोहमार्ग पोलीस येथे पोहोचले आणि त्यांनी प्रवाशांची मनधरणी केली. अखेर तासाभरानंतर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि आंदोलक ट्रॅकवरून बाजूला झाले.