ऐरोली येथील घटना; प्रवाशांचा खोळंबा
पनवेलहून ठाण्याकडे येणाऱ्या लोकलचे चार डबे ऐरोली-रबाळेच्या दरम्यान घसरल्याने या मार्गावरील रेल्वे सेवा शनिवारी तब्बल चार ते पाच तास विस्कळीत झाली. रात्री उशिरापर्यंत या रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू होते. वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे मात्र प्रचंड हाल झाले.
पनवेल-ठाणे लोकल दुपारी साडे चार वाजता ऐरोलीच्या दरम्यान आली. याचवेळी या लोकलचे पाच, सात, नऊ आणि अकरा क्रमांकाचे चार डबे घसरले. डबे घसरताना मोठा आवाज झाल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट उडाली. महिला डब्यात कोलहाल माजला. काही प्रवाशांनी गाडीतून उडय़ाही टाकल्या. त्यामुळे प्रचंड गोंधळ उडाला.
चार डबे घसरल्याची माहिती गाडीचे गार्ड के. सी. संत यांनी तात्काळ ठाणे रेल्वे पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. तातडीने मदतकार्य करणारी गाडी ऐरोलीच्या दिशेने पाठविण्यात आली. अर्धा ते एक तासाने घसरलेले डबे रेल्वेमार्गावरून बाजूला करण्याचे काम सुरू झाले.
वाहतूक ठप्प
डबे घसरण्याच्या घटनेमुळे ठाण्याहून वाशी, पनवेलकडे जाणारी रेल्वे सेवा ठप्प झाली. पनवेल, तळोजा, नवी मुंबई परिसरातील विविध कंपन्या, आस्थापनांमध्ये काम करणारे कर्मचारी शनिवार असल्याने अर्धा दिवस पूर्ण करून घराकडे परतत होते. ऐरोलीजवळ अनेक जण अडकून पडले. दोन तासात दोन डबे बाजूला करण्याचे काम पूर्ण करण्यात आले होते. उर्वरित डबे बाजूला करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले होते. ठाणे, डोंबिवलीकडे जाणाऱ्या प्रवाशांना मधल्या मार्गाने जाण्याचा पर्याय उपलब्ध नसल्याने अनेक जणांनी रस्त्यावर येऊन रिक्षा, मिळेल त्या वाहनाने ठाणे गाठणे पसंत केले. रिक्षा चालकांनी मात्र अव्वाच्या सव्वा भाडे आकारत आपदग्रस्तांना वेठीस धरले. नवी मुंबईकडून ठाणे, डोंबिवलीकडे जाणाऱ्या बस प्रवाशांनी खच्चून भरून जात होत्या.