डिझेलच्या किमती सतत वाढत असल्याने रेल्वेला मालवाहतुकीतून  मिळणाऱ्या नफ्याचे परिणाम घटत चालले आहे. मालवाहतुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून राहणे रेल्वे खात्यासाठी अवघड होत चालले आहे. यामुळे प्रवासी भाडेवाढ करून सेवासुविधा देण्याचा प्रयत्न रेल्वे करणार असल्याचे रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मंगळवारी, (ता. २६) मांडण्यात येणाऱ्या रेल्वे अर्थसंकल्पात प्रवासी भाडेवाढ केली जाण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
मालवाहतुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून प्रवाशांना सोयीसुविधा देण्याचा पायंडा गेली दहा वर्षे रेल्वे खात्याने पाडला होता. त्यामुळे प्रवासी भाडय़ातील तोटय़ाचा भारही मालवाहतुकीवर पडला. मात्र, अन्य वाहतूक साधनांच्या तुलनेमध्ये रेल्वेची मालवाहतूक स्वस्त असल्याने विशेष तोटा सहन करावा लागला नाही. मालवाहतुकीमधून मिळणाऱ्या उत्पन्नातून अन्य विभागातील खर्चाचा भार उचलणे आतापर्यंत रेल्वेला शक्य झाले; तथापि सहाव्या वेतन आयोगामुळे पडलेला बोजा रेल्वेच्या नियोजनावर पडला आहे. त्यातच सेवानिवृत्तांच्या वेतनाचाही भार वाढत आहे.
रस्त्यावरील वाहतुकीच्या साधनांचा दर्जा वाढला तसेच महामार्ग चांगले झाल्यामुळे वाहतूक सुधारली आहे. सिमेंट, कोळसा, लोखंड आणि स्टील यांची वाहतूक रेल्वेमधून जास्त होत असली तरी आता त्याचे प्रमाण वेगवेगळ्या कारणांस्तव कमी झाले आहे. गेल्या महिन्यात झालेल्या डिझेलच्या किमतीतील वाढीमुळे रेल्वेवर ३३०० कोटी रुपयांचा वाढता बोजा पडला. त्यामुळे २२ जानेवारीला २१ टक्के अशी मोठी प्रवासी भाडेवाढ करूनही त्याचा फारसा लाभ रेल्वे खात्याला झाली नाही. प्रवासी भाडय़ातील वाढीतून मिळालेल्या ६६०० कोटी रुपयांतील मोठा हिस्सा डिझेल दरवाढीचा बोजा कमी करण्यासाठी वापरावा लागला.
 रेल्वेला प्रवासी भाडय़ात २००४-०५ मध्ये ६,१५९ कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. २०१२-१३ मध्ये हा तोटा २५ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वाणिज्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. तो भरून काढण्यासाठी  मालवाहतुकीच्या भाडय़ातही फेरबदल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  
प्रवासी भाडेवाढ का?
* रेल्वेमंत्री बन्सल यांच्याकडूनच डिझेल दरवाढीमुळे शक्यता सूचित
* चालू आर्थिक वर्षांसाठीचे रेल्वे खात्याचे उत्पन्नाचे उद्दिष्ट १ लाख ३५ हजार कोटी रुपये निर्धारित. प्रत्यक्षात गेल्या दहा महिन्यांत झालेले उत्पन्न १ लाख १ हजार २२३ कोटी रुपये.
*  यामुळे उर्वरित महिन्यात ३४ हजार कोटींचे उत्पन्न मिळणे अवघड.
*  मालवाहतुकीच्या उत्पन्नातही सुमारे १९ कोटी रुपयांची घट
* उत्पन्नवाढीसाठी प्रवासी भाडेवाढीचाच पर्याय उपलब्ध