अंबाला येथून मुंबईत परतत असताना चोराशी दोन हात करताना गाडीतून खाली पडल्याने एक पाय गमवावा लागलेल्या किरण मेहता या तरुणीला अखेर रेल्वेने नुकसान भरपाई म्हणून २ लाख ८० हजार देण्याची तयारी दाखवली आहे. त्याबाबतचा धनादेश सोमवारी उच्च न्यायालयात सादर करण्यात आला व आठवडय़ाभरात ही रक्कम या तरुणीच्या खात्यात जमा होईल, असा दावा रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आला.
नुकसान भरपाई तसेच वैद्यकीय उपचाराचा खर्च देण्यास टाळाटाळ करणाऱ्या रेल्वे प्रशासनाविरोधात किरणने अ‍ॅड्. उदय वारुंजीकर यांच्यामार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. चोराशी दोन हात करताना किरण गाडीतून पडली होती. या अपघातात तिला एक पाय गमवावा लागला. परंतु, सुरुवातीच्या उपचाराचे आणि नंतर कृत्रिम पाय बसवण्यासाठी आलेल्या खर्चासाठी तिने रेल्वेकडे अर्ज केला होता. मात्र हा खर्च तर दूर नुकसान भरपाईची रक्कम देण्यासही रेल्वेने टाळाटाळ केली. एवढेच नव्हे, तर तिला कुणी सांगितले होते धावत्या गाडीत चोराशी झटापट करायला, असा अजब दावा रेल्वेने केला होता. या दाव्याचा न्यायालयाने खरपूस समाचार घेत रेल्वेला धारेवर धरले होते. त्यानंतर नरमाईची भूमिका घेत रेल्वेतर्फे उपचाराचा काही प्रमाणात खर्च देण्यात आला. रेल्वे कायद्यानुसार प्रवाशांची सुरक्षा ही रेल्वेची जबाबदारी असून रेल्वेच्या हद्दीत प्रवाशांना काही झाले तर त्याची नुकसान भरपाई रेल्वेला द्यावी लागेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.