शाळेत असताना माझ्यावर कुठलीही जबाबदारी नव्हती. दहावीला असताना घरातून मला फक्त पास व्हायला सांगितलं होतं. आपल्या शालेय जीवनातल्या आठवणी सांगताना राज ठाकरेंनी हा खुलासा केला. बालदिनाच्या निमित्ताने बुधवारी एबीपी माझा वाहिनीवरील ‘ऐसपैस गप्पा, राज काकांशी’ या कार्यक्रमात ते बोलत होते. चौथीनंतरच्या माझ्या प्रत्येक प्रगतीपुस्तकावर बाळासाहेबांची सही आहे अशी आठवण राज यांनी सांगितली.

शाळेत असताना चित्रकला सर्वात आवडता विषय होता. त्यानंतर मराठी, इतिहास, भूगोल आणि हिंदी या विषयांमध्ये रस होता. दहावीला असताना मला फक्त ३७ टक्के मिळाले होते असे राज यांनी सांगितले. शाळेत असताना खूप खोट बोलायचो पण आता सरकार बोलत तसं नाही असे राज म्हणाले. शाळेत मला पहिला बेंच सोडून कुठल्याही बेंचवर बसायला आवडायचे.

शाळेत असताना फक्त दोनदाच सहलीला गेलो. महाबळेश्वरला आमची सहल जायची. सहलीमध्ये बापूसाहेब रेगेंचे सतत लक्ष असल्यामुळे आनंदच घेता आला नाही असे राज म्हणाले. यावेळी लहान मुलांनी त्यांना व्यंगचित्रांबद्दल, लहानपणीच्या आठवणींबद्दल अनेक प्रश्न विचारले. राज यांनी सुद्धा लहान मुलांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे देत व्यंगचित्राबद्दलचे बारकावे समजावले. आपल्याला कोणाची मुलाखत घ्याययला आवडेल, काळ मागे गेला तर कोणाला भेटायला आवडेल या प्रश्नांची उत्तरे दिली. आपली भाषणाची भिती कशी निघून गेली ती आठवण सुद्धा त्यांनी सांगितली.