बाजारात यंदा राख्यांचे नानाविध प्रकार; लहान मुलांसाठी कार्टून व्यक्तिरेखांच्या छबी राखींवर

भावाच्या मनगटावर राखी बांधल्यानंतर त्याचे तोंड गोड करण्याचा रिवाज जुनाच असला तरी, यंदाच्या वर्षी राखीच भाऊरायाचे तोंड गोड करेल, अशी व्यवस्था बाजारात विक्रीस आलेल्या जेलीच्या राख्यांनी केली आहे. बच्चेकंपनीला आवडणाऱ्या गोड जेलीच्या राख्यांपासून बांबूने बनवलेल्या राख्या यंदा पसंतीला उतरत आहेत.

रक्षाबंधनानिमित्त बाजारात येणाऱ्या राख्यांचे आकार, रंग, कलाकुसर, चित्रे यावर त्या त्या वर्षांतील गोष्टी, घडामोडी, गाजलेल्या व्यक्ती/व्यक्तिरेखा यांचा प्रभाव पडत असतो. तोच कल यंदाही कायम आहे. यावर्षीचा बहुचर्चित चित्रपट ‘बाहुबली २’मधील व्यक्तिरेखा यंदाच्या राख्यांवर अधिक दिसत आहेत. विशेषत: बच्चेकंपनीला ‘बाहुबली’ची विशेष ओढ असल्याने बाहुबलीचे चित्र असलेल्या किंवा हलणारा ‘बाहुबली’ असलेल्या राख्यांना यंदा पसंती आहे. अशा राख्या ४० ते ५० रुपये दराने विकल्या जात आहेत. याखेरीज लहान मुलांच्या हमखास पसंतीच्या कार्टून व्यक्तिरेखा असलेल्या राख्यांना दरवर्षीप्रमाणे यंदाही मागणी आहे.

रक्षाबंधनाला अधिक गोड करण्यासाठी ‘जेली’च्या राख्याही बाजारात येऊ घातल्या आहेत. जेली आणि दुधाची पावडर यांचे मिश्रण करुन ही राखी तयार करण्यात आली आहे. जेलीच्या राखीला पॅकबंद करुन त्याला खालच्या बाजूला दोरा लावल्यावर ती राखी मनगटाला बांधण्यासाठी तयार होते. ‘द पिकंट’ या संस्थेतर्फे मुंबईत जेलीपासून राख्या बनवण्याच्या कार्यशाळाच आयोजित करण्यात आल्या आहेत. अशा राख्या मिठायांच्या दुकानांत विक्रीसाठी पाठवल्या जात असल्याचे ‘द पिंकट’च्या प्रियंका चमणकर यांनी सांगितले.  जेली पासून बनवलेली ही राखी साधारण चार ते पाच दिवस टिकते. बाजारात ५० ते ६० रुपयांत तिची विक्री करण्यात येत आहे.