वाकोला विभागाचे सहाय्यक पोलीस उपायुक्त वसंत ढोबळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याने वाकोला-सांताक्रूझ परिसरातील अवैध धंदे करणारे लोक, फेरीवाले यांचे फावले असले तरी सर्वसामान्य नागरिक प्रचंड संतापले आहेत. रस्त्यावर अनधिकृतरित्या बसणाऱ्या फेरीवाल्यांनाशिस्त लावण्याचे ढोबळे यांचे काम जनहिताचे असतानाही राजकीय दबावाखाली त्यांची बदली करण्यात आल्याचा आरोप करीत रविवारी सांताक्रूझ-वाकोला परिसरातील हजारो नागरिकांनी वाकोला पोलीस ठाण्यावर ढोबळे यांच्या बदलीविरोधात प्रचंड मोर्चा काढला.
वसंत ढोबळे हे कायद्याचे संरक्षण करत असून सामान्य जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांचेच निराकरण करीत आहेत. याउलट अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करणाऱ्या ढोबळे यांच्याविरुद्ध सरकारकडे तक्रारी करून समस्या निर्माण करणाऱ्यांनाच पाठीशी घालत असून सरकारही राजकीय कारणांमुळे अशा दबावाला बळी पडत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया या मोर्चात हजर असलेल्या नागरिकांमधून उमटत होती. ढोबळेंवरील कारवाईच्या विरोधात मोठय़ा प्रमाणात जनमत संघटित होत असून येत्या काही दिवसांत सरकारला याची दखल घ्यावीच लागेल, असेही काही मोर्चेकऱ्यांनी सांगितले. संपूर्ण मुंबईची समस्या असलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांना हटविणाऱ्या ढोबळे यांच्याविरुद्ध तक्रारी करणारा काँग्रेस नेता स्वत वादग्रस्त असताना, त्याच्या तक्रारीवरून एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची राज्य सरकारची कृती संतापजनक आहे, असा टोलाही काही मोर्चेकऱ्यांनी कृपाशंकर सिंह यांचा नामोल्लेख टाळत मारला. ढोबळेंचा जयजयकार करणाऱ्या या मोर्चेकऱ्ऱ्यांनी काँग्रेसचे आमदार कृपाशंकर सिंह, कृष्णा हेगडे तसेच खासदार प्रिया दत्त यांच्या विरोधात घोषणाही दिल्या.  
अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी शनिवारी ढोबळे आपल्या पथकासह गेले असता कारवाईतून बचावण्यासाठी आपले सामान घेऊन पळणारा फळविक्रेता मदन जयस्वाल याचा मृत्यू झाला. हा मृत्यू नैसर्गिक असल्याचे व्ही. एन. देसाई रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले. तरीही आमदार खासदारांच्या तक्रारी आणि फेरीवाला संघटनेच्या दबावापुढे झुकून ढोबळे यांची बदली करून त्यांची चौकशी करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने सांताक्रूझ-विलेपार्ले तसेच वाकोल परिसरातील संतप्त नागरिकांनी या मुद्दय़ावर आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करणाऱ्या महापालिका पथकातील काही अधिकारीही ढोबळे यांच्यावरील कारवाईमुळे नाराज झाले आहेत. ढोबळे यांच्यावरील कारवाईमुळे आता अनधिकृत फेरीवाल्यांचे फावेल आणि त्यांच्यावर कारवाई करणाऱ्या कोणासही हजार वेळा विचार करावा लागेल, अशा शब्दांत एका अधिकाऱ्याने ढोबळे यांच्या बदलीबद्दल नाराजी व्यक्त केली. ढोबळे यांच्या बदलीमुळे महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी किंवा फेरीवालाविरोधी कारवाईला खीळ बसेल, अशी भीतीही त्याने व्यक्त केली.