काँग्रेस आणि शिवसेनेने माघार घेतल्याने विधान परिषदेच्या सभापतीपदी राष्ट्रवादीचे रामराजे नाईक-निंबाळकर यांची शुक्रवारी बिनविरोध निवड झाली. सभापतीपदावरून झालेल्या राजकीय घडामोडींमध्ये काँग्रेसची फरफट झाली. सभापतीपद गेले तसेच राष्ट्रवादी आणि भाजपच्या वाढत्या जवळीकीमुळे दोन्ही पक्ष पडद्याआडून काँग्रेसची ताकद कमी करण्यासाठी यापुढील काळात अधिक प्रयत्न करण्याची शक्यता आहे.
चार अर्ज दाखल झाल्याने सभापतीपदाच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. भाजप आणि शिवसेनेत समझोता झाल्याने काँग्रेसने जास्त ताणून न धरता उमेदवार मागे घेण्याचा निर्णय घेतला. परिणामी रामराजे नाईक-निंबाळकर यांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला. फलटणचे नगराध्यक्षपद, मंत्रिपद भूषविलेले नाईक-निंबाळकर हे १९९५ ते २००९ पर्यंत विधानसभेचे आमदार होते. मतदारसंघ राखीव झाल्याने २०१० मध्ये त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली. पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे खास निकटवर्तीय मानले जाणारे िनबाळकर यांच्या आमदारकीची आणखी दीड वर्ष मुदत शिल्लक आहे. विधिमंडळात कागदाचा वापर टाळण्याकरिता ई-कारभार करण्यावर नवे सभापती निंबाळकर यांनी भर दिला. तरुण वर्गात व्यवस्थेबद्दल निर्माण झालेली चिड दूर करण्याचे प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सभागृह नेते एकनाथ खडसे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माणिकराव ठाकरे, सुनील तटकरे, जयंत पाटील आदींनी नव्या सभापतींचे अभिनंदन केले.
काँग्रेसचे नुकसान
सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्याने काँग्रेसला हे पद गमवावे लागले. अविश्वास ठरावाच्या निमित्ताने राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र आले. भाजप आणि राष्ट्रवादीच्या जवळीकीबद्दल राज्यात वातावरण तापविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असला तरी त्याचा फार काही परिणाम होणार नाही, असा राष्ट्रवादीचा दावा आहे. ‘काँग्रेसमुक्त महाराष्ट्र’ हे भाजप आणि राष्ट्रवादी या दोघांचेही उद्दिष्ट असल्याने आगामी काळात काँग्रेसचे प्राबल्य असलेल्या क्षेत्रांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी पडद्याआडून परस्परांना मदत करण्याची शक्यता आहे.
सारीच पदे राष्ट्रवादीकडे
विधान परिषदेचे सभापती, उपसभापती आणि विरोधी पक्षनेते ही सारीच पदे आता राष्ट्रवादीकडे आली आहेत. सारी पदे एकाच पक्षाकडे असणे हा दुर्मिळ प्रसंग आहे. सभापती निंबाळकर यांच्याप्रमाणेच त्यांचे जावई नार्वेकर हे दोघेही एकाच सभागृहाचे सदस्य आहेत.