अल्पवयीन तरुणीचं अपहरण करुन बलात्कार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या सांताक्रूझमधील व्यवसायिकाची सत्र न्यायालयाने सुटका केली आहे. पीडित तरुणीने केलेले आरोप आणि जबाबांमध्ये समानता नसून, वैद्यकीय तपासणीदरम्यान डॉक्टरांनाही वेगळी माहिती दिली असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. पीडित तरुणीने केलेल्या आरोपाच्या आधारे पोलिसांनी व्यवसायिकाविरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक केली होती. गेल्या तीन वर्षांपासून तो कारागृहात शिक्षा भोगत होता.

फिर्यादी वकिलाने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा ही घटना घडली तेव्हा पीडित तरुणी दहावीत शिकत होती. व्यवसायिक इमरान खान तिच्या शेजारी राहत होता. जेव्हा दोघे सतत एकमेकांशी फोनवर बोलतात ही माहिती तरुणीच्या वडिलांना मिळाली तेव्हा ते तिला काही दिवसांसाठी शहराबाहेर घेऊन गेले. ६ फेब्रुवारी २०१५ रोजी जेव्हा ते कामावर होते तेव्हा त्यांच्या पत्नीने फोन करुन मुलगी पळून गेली असल्याचं सांगितलं.

तरुणीच्या वडिलांनी पोलीस स्टेशन गाठत मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तरुणीचं अपहरण करत वांद्रे, उत्तर प्रदेश आणि हैदराबाद अशा वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार करण्यात आल्याचा आरोप करत इमरान खानविरोधात चार्जशीट दाखल केली.

न्यायालयात सहा साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली होती, ज्यामध्ये तरुणीसह तिचे वडिल आणि दोन पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश होता. तरुणीने इमरान खान आपला पाठलाग करायचा आणि नेहमी तू आवडतेस असं सांगायचा अशी माहिती न्यायालयात दिली. आपण आपल्या कुटुंबाला याबद्दल सांगितलं नव्हतं असंही तिने सांगितलं.

तरुणीने न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, ६ फेब्रुवारी २०१५ रोजी इमरान खानने जुहू गार्डनला भेटायला बोलावलं. तरुणीच्या वडिलांनी मात्र उलटतपासणीदरम्यान आपल्याला दोघांच्या नात्याबद्दल कल्पना होती अशी माहिती दिली. न्यायालयाने तरुणी स्वत:च्या मर्जीने इमरानसोबत गेली असल्याचं सांगत, तिच्या वडिलांनाही याची कल्पना होती असा निष्कर्ष काढला.

तरुणीने बलात्काराचा आऱोप करताना आपल्याला सुरुवातीला वांद्रे येथील एका रुममध्ये नेऊन तीन दिवस ठेवण्यात आलं. नंतर शारिरीक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली असल्याचं सांगितलं. यानंतर उत्तर प्रदेशात नेऊन तीन महिने तिथेच डांबून ठेवत नंतर हैदराबादला नेण्यात आलं. न्यायालयात तरुणी १८ वर्षांची झाल्यानंतर इमरानने तिच्याशी लग्न करत मुंबईला आणलं अशी माहिती देण्यात आली होती.

मात्र वैद्यकीय तपासणीदरम्यान तरुणीने आपले इमरानसोबत प्रेमसंबंध होते आणि स्वत:च्या मर्जीने त्याच्यासोबत वेगवेगळ्या ठिकाणी राहत होतो असं सांगितलं. आपल्याला वैद्यकीय तपासणी करायची नसल्याचंही ती वारंवार सांगत होती. यानंतर न्यायालायने तरुणीवर जबरदस्ती झाला असल्याचा आरोप फेटाळून लावत इमरानची सुटका केली आहे. न्यायाधीश डी एस देशमुख यांनी ७ ऑगस्ट रोजी त्याच्या सुटकेचा आदेश दिला.