23 April 2019

News Flash

‘कॅस्ट्रोल इंडिया’च्या रश्मि जोशी ‘व्हिवा लाउंज’मध्ये

लोकसत्ता ‘व्हिवा लाउंज’चे नवे पर्व हे अर्थकारण लीलया सांभाळणाऱ्या रश्मि जोशी यांच्या उपस्थितीने रंगणार आहे

आपल्याला जे जे साध्य करायचे आहे ते आपण सहजपणे मिळवू शकतो. फक्त त्यासाठी आपली इच्छाशक्ती हवी, प्रयत्न हवेत. आपल्या क्षमतांना आपले संकुचित विचारच अडथळे निर्माण करू शकतात, हे ठामपणे मांडणाऱ्या रश्मि जोशी आज ‘कॅस्ट्रोल इंडिया’सारख्या मोठय़ा कंपनीचा अर्थपसारा सहज सांभाळत आहेत. स्त्रिया आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतायेत, हे आपण सहजपणे मांडत राहतो मात्र आपल्या कर्तृत्वाने ते सिद्ध करून दाखवणाऱ्यांमध्ये रश्मि जोशी यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. ‘कॅस्ट्रोल इंडिया’च्या पूर्णवेळ संचालक आणि प्रमुख वित्तीय अधिकारी असलेल्या रश्मि जोशी यांच्याशी ‘व्हिवा लाउंज’मध्ये गप्पा मारण्याची संधी मिळणार आहे.

लोकसत्ता ‘व्हिवा लाउंज’चे नवे पर्व हे अर्थकारण लीलया सांभाळणाऱ्या रश्मि जोशी यांच्या उपस्थितीने रंगणार आहे. ‘केसरी’ प्रस्तुत ‘व्हिवा लाउंज’च्या गप्पांचा हा कार्यक्रम २० एप्रिलला, शुक्रवारी मुलुंड पश्चिमेकडील ‘महाराष्ट्र सेवा संघ’ येथे संध्याकाळी सहा वाजता होणार आहे. कॉर्पोरेट विश्वात अग्रगणी असलेल्या महिला अधिकाऱ्यांविषयी आपल्याला कायम अप्रूप वाटत असते. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या क्षेत्रात स्वत:च्या कर्तृत्वाने आपले स्थान निर्माण करणे हे सहजसोपे नाही पण ते अशक्यही नाही. अत्यंत किचकट आणि व्यवहारी असलेल्या या क्षेत्रात केवळ अधिकारी पद मिळवून त्यापुरते रश्मि जोशी मर्यादित राहिलेल्या नाहीत. तर त्यांनी आपल्या कामाच्या धबडग्यातही आपले कलासक्त मन जपले आहे. गेली २५ वर्षे त्या कॉर्पोरेट क्षेत्रात आहेत. ‘कॅस्ट्रोल इंडिया’मध्ये कार्यकारी संचालक म्हणून रुजू झालेल्या त्या पहिला महिला अधिकारी होत्या. याआधी त्यांनी सिंगापूरमध्ये चार वर्षे ‘कॅस्ट्रोल’च्या आशिया-पॅसिफिक विभागाचे काम पाहिले होते. त्यावेळी १७ देशांमधील कंपनीच्या व्यवसायाची जबाबदारी त्यांच्यावर होती. कंपनीने टाकलेल्या या जबाबदाऱ्या सार्थ ठरवत त्या आज ‘कॅस्ट्रोल इंडिया’च्या संचालक आणि प्रमुख वित्तीय अधिकारी या पदावर विराजमान झाल्या आहेत.

त्यांच्या कार्याचा आवाका जितका मोठा आणि थक्क करणारा आहे तितकाच त्यांचा प्रत्येक छोटय़ा गोष्टींमध्ये आनंद घेणारा स्वभावही आपल्याला आश्चर्यात टाकणारा आहे. रश्मि यांचा जन्म डोंबिवलीत झाला. येथील स. वा. जोशी विद्यालयातून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुलुंडच्या ‘कॉलेज ऑफ कॉमर्स’मधून आपले पदवी शिक्षण त्यांनी पूर्ण केले. त्यानंतर त्या सनदी लेखापाल झाल्या.

आज आर्थिक क्षेत्राचे सुकाणू त्यांच्या हातात असले तरी त्या बॉलीवूडपटांमध्येही तितकाच रस घेतात, संगीत त्यांना आवडते, प्रवास करायला आवडतो. कर्तृत्व आणि छंद दोन्हींचा ताळमेळ यशस्वीरीत्या साधलेल्या रश्मि जोशी यांचा आजवरचा प्रवास जाणून घेण्याची संधी ‘व्हिवा लाउंज’ या कार्यक्रमातून मिळणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश दिला जाईल. काही जागा निमंत्रितांसाठी राखीव ठेवण्यात येतील.

  • कधी : सायंकाळी ६ वाजता, शुक्रवार, २० एप्रिल
  • कुठे : ‘महाराष्ट्र सेवा संघ’ मुलुंड पश्चिम
  • प्रवेश: या कार्यक्रमासाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश दिला जाईल.

First Published on April 17, 2018 5:19 am

Web Title: rashmi joshi castrol india loksatta viva lounge