इंदू मिलची जागा देण्यासाठी शासनाने स्पष्ट संकेत दिल्यानंतर दलित नेत्यांमध्ये श्रेय घेण्यावरून चढोओढ सुरू झाली आहे. पोस्टर्स, बॅनर्स, सभांच्या आणि मुलाखतीच्या माध्यमातून श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु इंदू मिलची जागा डॉ. आंबेडकरांच्या स्मारकासाठी मिळावी, यासाठी गेल्या दहा वर्षांपासून पडद्यामागून फक्त कागदावरची लढाई लढणारा चंद्रकांत भंडारे नावाचा भीमसैनिक मात्र कुठल्याही चर्चेत किंवा बॅनरवर दिसत नाही.
२०११ च्या डिसेंबर महिन्यात राजकीय हेतूने आंदोलनाची ठिणगी पडली आणि सगळ्यांच्या डोळ्यासमोर इंदू मिलच्या जागेवरील स्मारक उभे राहिले. पण याच मिलच्या जागेची पहिली मागणी ५ सप्टेंबर २००३ साली केंद्र सरकारकडे भंडारे यांनी केली होती. त्यांनतर सतत पत्रव्यवहारही सुरू ठेवला होता. कामगारांची आणि इतर ३९८७ कोटी रूपयांची देणी बाकी असल्याने ही जागा आंबेडकरांच्या स्मारकासाठी देणे उचित ठरणार नाही असे राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाने भंडारेंना कळविले होते. आम्ही ती रक्कम देण्यास तयार आहोत तुम्ही फक्त बॅंक आणि बॅक खाते क्रमांक कळवा असे पत्र भंडारे यांनी २००५ च्या दरम्यान पाठविले होते. पण त्यांच्या या पत्राला मात्र वस्त्रोद्योग विभागाचे उत्तर आले नाही.
हे सुरू असताना स्मारकाच्या लढाईत उडी घेण्यासंदर्भात भंडारेंनी सर्वच राजकीय पक्षांनाही पत्रे लिहली होती. पण फक्त रा सू गवई आणि आबू आझमी यांनी, आम्ही तुमच्या सोबत आहोत अशी ग्वाही देणारी पत्रे पाठविली होती. नंतर २००६ ते २०११ पर्यंत विजय कांबळेनीही काही प्रमाणात आंदोलने केली. त्यानंतर आनंदराज आंबेडकर, रामदास आठवले या सारख्या नेत्यांसह काही संघटनांनी याचे महत्व ओळखून या आंदोलनात उडय़ा घेतल्या. ही आंदोलने आणि राजकारण सुरू असताना शासनानाला पत्रव्यवहाराने भंडवून सोडणाऱ्या भंडारेंनी मात्र आपला पत्रव्यवहार अविरतपणे सुरू ठेवलाच होता.