16 December 2017

News Flash

आमिषे,सवलतींच्या वर्षांवातही मुंबईतील घरांच्या विक्रीचा घट रिकामाच!

कमालीच्या मंदावलेल्या मुंबईतील घरांच्या विक्रीला दसरा-दिवाळी, ईद आणि आता नाताळ अशा सणोत्सवाच्या काळात तरी

व्यापार प्रतिनिधी, मुंबई | Updated: December 11, 2012 5:01 AM

कमालीच्या मंदावलेल्या मुंबईतील घरांच्या विक्रीला दसरा-दिवाळी, ईद आणि आता नाताळ अशा सणोत्सवाच्या काळात तरी उभारी मिळावी म्हणून झालेले प्रयत्न व क्लृप्त्या व्यर्थच ठरल्याचे दिसून येत आहे. सणांचा हंगाम सरत आला तरी या क्षेत्राला उत्साही भरते येताना दिसत नाही. अगदी उच्चपदस्थ नोकरदारांच्या खिशालाही परवडणार नाहीत अशा किमतीला बनत असलेली नवीन घरे, हेच यामागील प्रमुख कारण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
सप्टेंबर ते डिसेंबर हा सणासुदीचा काळ नव्या घरांच्या खरेदीचा सर्वोत्तम हंगाम मानला जातो. पण गेली सलग दोन वर्षे नेमक्या याच महिन्यांत घरांच्या विक्रीला घरघर लागत असल्याचे दिसून येते. मुंबईच्या नोंदणी व मुद्रांक विभागाकडील उपलब्ध आकडेवारीनुसार सप्टेंबर २०१२ च्या तुलनेत यंदा ऑक्टोबरमध्ये मुंबईतील खरेदी झालेल्या घरांची नोंदणी तब्बल ८.५ टक्क्यांनी घटली आहे. सप्टेंबरमध्ये ४५०० नवीन घरांच्या खरेदीची नोंदणी करण्यात आली, तर ऑक्टोबरमध्ये हा आकडा घसरून ४,११५ वर आला.     
गुंतवणूक म्हणूनही घरखरेदीकडे पाठ
गुंतवणूक म्हणून घरांची खरेदी करण्याचा सर्वसामान्य कलही घसरणीला लागला आहे. गेले वर्ष-दीड वर्ष दाटलेले मंदीसदृश वातावरण पाहता जागेतील गुंतवणुकीतून नजीकच्या काळात परतावा मिळण्याची शक्यता दिसत नसल्यामुळे असे घडत आहे, असा कयास ‘द असोसिएशन ऑफ रिअल इस्टेट एजंट्स’चे अध्यक्ष जयेश व्यास यांनी व्यक्त केला. शिवाय यंदा ऑक्टोबरमध्ये-नोव्हेंबरमध्ये हजारोंच्या संख्येने झालेली लग्ने पाहता, या लग्नसराईच्या लगबगीतून उसंत मिळाल्यावर फुरसतीनेच घरातील गुंतवणुकीसंबंधाने निर्णय धनिक वर्गाकडून घेतला जाणे अपेक्षित आहे. परिणामस्वरूप ऑक्टोबरमध्ये खरेदी आणि घरांच्या नोंदणीचा आकडाही घटला असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले.

First Published on December 11, 2012 5:01 am

Web Title: reduction in sale of flat in mumbai after inducement and discount
टॅग Flat,Reduction,Sale