प्रजा फाऊंडेशनचा अहवाल जाहीर; सुमार कामगिरी करणाऱ्यांमध्ये शिवसेनेचे चार, तर भाजपच्या तिघांचा समावेश

मुंबईकरांनी नागरी प्रश्न सोडविण्यासाठी निवडून दिलेल्या नगरसेवकांची गेल्या वर्षभरातील कामगिरी फारशी चांगली नसल्याचे प्रजा फाऊंडेशनने जाहीर केलेल्या अहवालावरून उघड झाले आहे. पालिका सभागृहात नागरी समस्यांविषयी एकही प्रश्न उपस्थित न करणाऱ्या १३ नगरसेवकांचे प्रगतीपुस्तक लाल शेऱ्यांनी रंगले असून त्यात शिवसेनेच्या चार, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी तीन, काँग्रेसच्या दोन, तर एआयएमआयएमच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे.

नागरी प्रश्नांऐवजी रस्ते, चौक, इमारती, स्थानके यांच्या नामकरणातच नगरसेवकांना अधिक रस असल्याचे प्रजा फाऊंडेशनच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.  मुंबई महापालिकेची फेब्रुवारी २०१७ मध्ये निवडणूक झाली आणि निवडणुकीत २२७ नगरसेवक विजयी होऊन पालिकेत दाखल झाले. प्रजा फाऊंडेशनने मार्च २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीतील नगरसेवकांच्या कामगिरीचा आढावा घेतला. पालिका सभागृह, विविध समित्यांच्या बैठकीला असलेली उपस्थिती, नगरसेवकांनी बैठकांमध्ये विचारलेले प्रश्न, अर्थसंकल्पाचा वापर, शैक्षणिक पात्रता, गुन्हेगारी नोंदी, आयकरविषयक अहवाल, प्रभागामध्ये नगरसेवकाची असलेली प्रतिमा आदींचा आढावा घेऊन ‘प्राजा फाऊंडेशन’ने नगरसेवकांचे प्रगतीपुस्तक तयार केले असून २०१७-१८ या वर्षांमध्ये १३ नगरसेवक नापास झाले आहेत.

किशोरी पेडणेकर सर्वोत्तम

‘प्रजा फाऊंडेशन’ने पालिकेतील एकंदर कामगिरीमध्ये शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांना सर्वोत्तम नगरसेविकेचा मान बहाल केला आहे. ‘प्रजा फाऊंडेशन’च्या निकषानुसार किशोरी पेडणेकर यांना ८१.५९ गुण मिळाले असून त्यांना बैठकांच्या उपस्थितीमध्ये १५ पैकी १३.८२, नागरी प्रश्न विचारल्याबद्दल १० पैकी ९.७७ गुण मिळाले आहेत. सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या किशोरी पेडणेकर यांनी पहिला क्रमांक पटकावला आहे. काँग्रेसच्या नगरसेविका श्वेता कोरगावकर यांना ७९.२२, तर प्रीती साटम यांना ७९.१२ गुण मिळवून अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळविला आहे. या तिघांबरोबरच शिवसेनेचे मंगेश सातमकर, समाधान सरवणकर, यशवंत जाधव, अनिल पाटणकर, सचिन पडवण, सुजाता पाटेकर, काँग्रेसचे वीरेंद्र चौधरी यांनी उत्तम कामगिरी बजावणाऱ्या पहिल्या दहा नगरसेवकांच्या यादीत स्थान पटकावले आहे. पालिकेमध्ये सुमार कामगिरी असलेल्या शेवटच्या स्थानावर असलेल्या १० नगरसेवकांमध्ये एआयएमआयएमच्या शेहनवाज सरफराज हुसैन शेख, गुलनाझ मोहम्मद सलीम कुरेशी, भाजपच्या केसरबेन मुरजी पटेल, मुरजी पटेल, प्रीतम पंडागळे, अनिता पांचाळ, शिवसेनेचे परमेश्वर कदम, जगदीश थेवलपल्ली, काँग्रेसच्या विन्नीफ्रेड डिसोजा, राष्ट्रवादीचे नियाज सोफी यांचा समावेश आहे.

नगरसेवकांना नामकरणात रस

मुंबईमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. या खड्डय़ांविषयी नगरसेवकांनी सभागृह आणि अन्य समित्यांच्या बैठकांमध्ये ३६६ प्रश्न वर्षभरात उपस्थित केले. त्याखालोखाल ३२० प्रश्न रस्ते, चौक, बेटे, इमारती आणि स्थानकांच्या नामकरणांबाबत उपस्थित करण्यात आले होते. मुंबईमध्ये घनकचऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. मात्र याविषयी नगरसेवकांनी १५९ प्रश्न उपस्थित केले होते. आरोग्य, पाणीपुरवठा, उद्याने याबाबत अनुक्रमे १५१, ८४ आणि ८९ प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केले. मुंबईमध्ये सार्वजनिक शौचालयांचा प्रश्न गंभीर बनला आहे. पण नगरसेवकांनी केवळ ६८ प्रश्न उपस्थित केल्याचे उघडकीस आले आहे. पालिका शाळांमध्ये अपुऱ्या सुविधा असल्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मात्र नगरसेवकांनी शिक्षणाशी निगडित ६८, तर पालिका शाळांबद्दल ६७ प्रश्न उपस्थित केल्याचे ‘प्रजा फाऊंडेशन’च्या अहवालात नमूद केले आहे.

पहिल्या दहामधून भाजप गायब

नागरी प्रश्न उपस्थित करून ते सोडविण्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या पहिल्या १० क्रमांकांवरील नगरसेवकांमध्ये शिवसेनेच्या आठ, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या प्रत्येकी एका नगरसेवकाचा समावेश आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सईदा खान आघाडीवर असून त्यांनी सभागृहात १२८ प्रश्न उपस्थित केले आहेत. या यादीत शिवसेनेचे यशवंत जाधव, दत्ताराम नरवणकर, किशोरी पेडणेकर, राजुल पटेल, प्रज्ञा भुतकर, अनंत नर, शीतल म्हात्रे, समाधान सरवणकर, तसेच काँग्रेसचे रवी राजा यांचा समावेश आहे. मात्र पहिल्या १० नगरसेवकांमध्ये पालिकेतील पारदर्शकतेच्या पहारेकऱ्यांना क्रमांक मिळविता आलेला नाही.  कामगिरीच्या यादीत काँग्रेसनंतर भाजप आणि शिवसेनेचा क्रमांक आहे.

१३ नगरसेवक कोण?

या नगरसेवकांनी वर्षभरात आपल्या प्रभागातील नागरी प्रश्नाविषयी एकही प्रश्न पालिका सभागृह अथवा समित्यांच्या बैठकीत उपस्थित केलेला नाही. त्यात शिवसेनेचे जगदीश थैवलपल्ली, रेखा रामवंशी, रुतूजातारी, प्रीती पाटणकर, भाजपच्या केशरबेन पटेल, मुरजी पटेल, अनिता पांचाळ, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाझिया सोफी, रेशमबानो मोहमद हासिम खान, मनीषा रहाटे, काँग्रेसचे विन्नीफ्रेड डिसोजा, सुप्रिया मोरे आणि एआयएमआयएमच्या गुलनाथ मोहम्मद सलम कुरेशी या १३ जणांचा समावेश आहे.