परळच्या पशुवैद्यक महाविद्यालयात रविवारी कार्यक्रमाचे आयोजन

आपल्याकडे विविध क्षेत्रांतील नामांकित व्यक्तींना त्यांच्या आयुष्यभराच्या कार्याकरिता जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. या व्यक्तीच्या सामाजिक योगदानाची पोचपावती म्हणून सोहळेही होतात. असाच एक सोहळा येत्या आठवडय़ात रंगणार आहे. फक्त या सोहळ्याचे सत्कारमूर्ती दोन पायांवर चालणाऱ्या माणसाऐवजी चार पायांवर चालणारे श्वान असणार आहेत. या कार्यक्रमात मुंबईतील ‘बॉम्ब डिटेक्शन अ‍ॅण्ड डिस्पोजल स्कॉड’, रेल्वे पोलीस, मध्य रेल्वे (आरपीएफ) अशा विविध विभागांत आपले कर्तव्य उत्तमपणे बजावल्याबद्दल पाच श्वानांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.

रेल्वे पोलिसांच्या सेवेतील ‘मॅक्स’, ‘सॅण्डी’ आणि ‘ऑस्कर’ या श्वानांची निवड जीवनगौरव पुरस्कारासाठी केली आहे. ११ जुलै २००६ रोजी पश्चिम रेल्वेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतरच्या तपासणीत या तीनही श्वानांनी चांगली कामगिरी बजावली होती. त्यानंतर २६ नोव्हेंबर, २००८ मध्ये छत्रपती शिवाजी टर्मिनसवरील अतिरेकी हल्ल्यानंतरही अनेक श्वानांना रेल्वे स्थानकावर तपासणीसाठी नेण्यात आले होते. या वेळी रेल्वे पोलिसांचे ‘मॅक्स’, ‘सॅण्डी’ आणि ‘ऑस्कर’ हे तीनही श्वान आघाडीवर असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. विविध कार्यक्रमांना बडे मंत्री हजेरी लावण्यापूर्वी हे श्वान त्या ठिकाणी जाऊन फेरतपासणी करतात. यांच्यातील ‘ऑस्कर’ने तर भारतभरातील पोलीस श्वान स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.

याशिवाय पोलिसांच्या ‘बॉम्बे डिटेक्शन अ‍ॅण्ड डिस्पोजल स्कॉड’मधून दहा वर्षांच्या ‘शॉटगन’ या श्वानाची या पुरस्काराकरिता निवड करण्यात आली आहे. ‘शॉटगन’ने आपल्या नऊ वर्षांच्या कारकीर्दीत अनेक बॉम्ब ‘पकडून’ दिले आहेत. तर मध्य रेल्वेच्या ‘नॉटी’ या श्वानाचीही या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. मध्य रेल्वेच्या विशेष कारवायांमध्ये ‘नॉटी’चे मोठे सहकार्य लाभले आहे.

सन्मान सोहळा

* परळ येथील पशुवैद्यक महाविद्यालयातील वार्षिक सोहळ्यात प्रथमच पाच सेवानिवृत्त श्वानांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हे सर्व श्वान साधारण १० ते १२ या वयोगटांतील आहेत.

* यांच्यातील ‘शॉटगन’ आणि ‘नॉटी’ या श्वानांना काही महिन्यांपूर्वी दत्तक देण्यात आले असून ‘मॅक्स’, ‘सॅण्डी’ आणि ‘ऑस्कर’ हे श्वान काही दिवसांपूर्वी सेवानिवृत्त झाल्यामुळे ते अजूनही रेल्वेच्याच ताब्यात आहेत.

* जीवनगौरव पुरस्कार देताना त्यांचे नाव कोरलेली प्लेट, गळ्याचा पट्टा (स्कार्फ) आणि प्रशस्तिपत्रक देण्यात येईल.

* श्वानांचे विविध कार्यक्रम, श्वानांसाठी रक्तदान शिबिरही या वेळी आयोजित करण्यात आले आहे.