रिया चक्रवर्तीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तिचा जामीनही फेटाळण्यात आला आहे. NCB ने आज अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातली मुख्य संशयित आरोपी रिया चक्रवर्तीला ड्रग्ज सेवन आणि इतर आरोपांखाली अटक केली. अंमली पदार्थ विरोधी विभागाने ही कारवाई केली त्यानंतर तिला न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने रियाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसंच तिचा जामीन अर्जही फेटाळला आहे.

एनसीबीने कोर्टामध्ये रियाच्या जामिनाला विरोध दर्शवत युक्तीवाद केला. रिया चक्रवर्ती या प्रकरणातली आरोपी आहे. तिला जामीन मिळाला तर त्याचा परिणाम या प्रकरणावर होऊ शकतो. रियाने सुशांत सिंह प्रकरणात अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्यावर तपास करणं गरजेचं आहे असं एनसीबीने कोर्टात सांगितलं. दरम्यान रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी तिच्या जामिनासाठी कोर्टात बाजू मांडली. रियाने चौकशीत सहकार्य केले आहे. याप्रकरणी एनसीबीने रिमांड मागितलेली नाही. एनसीबीने तिची चौकशी पूर्ण केली आहे त्यामुळे तिला जामीन मिळाला पाहिजे असं मानेशिंदे यांनी म्हटलं. मात्र कोर्टाने रियाचा जामीन फेटाळला आहे.

२८ ऑगस्टला तपासासाठी मुंबईत आलेल्या एनसीबीच्या विशेष पथकाने १० दिवसांत शोविक, मिरांडा, दीपेशसह आठ आरोपींना अटक करून अंमली पदार्थ, रोकड आणि परकीय चलन जप्त केले. त्यानंतर आता एनसीबीकडून रियाच्या अटकेची मोठी कारवाई करण्यात आली.  अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक यांनी अनेकदा विविध व्यक्तींच्या माध्यमातून चरस, गांजा हे अंमली पदार्थ मागवल्याची आणि विकत घेतल्याची कबुली अटक आरोपी दीपेश सावंत याने दिल्याचे एनसीबीने न्यायालयाला सांगितले होते.