मालाड येथून एका तरुणीचे अपहरण करून तिचा विनयभंग करणाऱ्या रिक्षाचालकाला चारकोप पोलिसांनी शनिवारी अटक केली. श्रवणकुमार उपाध्याय (३०) असे त्याचे नाव आहे. बुधवारी रात्री त्याने या तरुणीचे अपहरण केले होते.
 कांदिवलीत राहणारी एक २४ वर्षीय तरुणी मालाडमध्ये एका खासगी कंपनीत काम करते तसेच रात्री मालाडमध्येच एमबीएच्या क्लासेससाठी जाते. रात्री १० वाजता क्लास सुटल्यावर ती रिक्षाने घरी येते. काही दिवसांपासून श्रवणकुमार उपाध्याय हा रिक्षाचालक तिला तिच्या क्लासबाहेरून आपल्या रिक्षातून घरी सोडत होता. बुधवारी रात्री जेव्हा ही तरुणी नेहमीप्रमाणे उपाध्यायच्या रिक्षात बसली तेव्हा त्याने या तरुणीला कांदिवली येथे तिच्या घराजवळ न नेता महावीर नगर येथे एका निर्जन स्थळी नेले. तेथे तिचा हात पकडून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तिने त्याच्या तोंडावर आपली बॅग मारून आपली सुटका करवून घेतली होती.
 या घटनेनंतर उपाध्यायने आपला मोबाइल क्रमांक बंद ठेवला होता; परंतु पोलिसांनी टॉवर लोकेशनच्या आधारे त्याला शोधून काढले. तो कांदिवली येथे राहणारा असून गेल्या दहा वर्षांपासून रिक्षा चालवतो. त्याच्यावर अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून रविवारी त्याला सुट्टीच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.