एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देणाऱ्या करारावर स्वाक्षरी करण्यास कर्मचारी संघटनेने नकार दर्शविला आहे. मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या चर्चेचे इतिवृत्त आम्हाला दाखविण्यात आलेले नाही. तसेच करारात देण्यात आलेली वाढ असमान असल्याने असा करार हा कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरविणारा आहे. या करारामध्ये सुधारणा करा अन्यथा या करारावर स्वाक्षरी करणार नाही, अशी भूमिका महाराष्ट्र स्टेट ट्रान्पोर्ट कामगार संघटनेने घेतली आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एसटी कामगारांच्या वेतनवाढीच्या प्रस्तावित करारामध्ये काही सुधारणा करून १० टक्के वेतनवाढीचा करार करण्याचे सुचविले. या करारामध्ये कनिष्ठ श्रेणीच्या कामगारांना किमान वेतनाच्या १० टक्के जास्त वाढ देण्यात आली असली तरी प्रत्यक्षात यामध्ये अनेक त्रुटी असल्याचे कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या चर्चेचे इतिवृत्त आम्हाला मिळालेले नाही आणि नेमका कराराचा मसुदा आम्ही पाहिलेला नाही. त्यामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचेही चव्हाण यांचे म्हणणे आहे. एसटीतील कामगार आणि प्रशासकीय सेवेतील कर्मचारी यांच्या शैक्षणिक पातळी आणि कामाचे स्वरूप यात तफावत असूनही त्यांना एकाच पातळीवर वेतनश्रेणी दिली तर कामगारांमध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो. कामगारांवर अन्याय करणारा करार आम्ही मान्य करणार नसून त्यामुळेच करारावर स्वाक्षरी करणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, राज्य शासनाकडून पाठविण्यात आलेल्या कराराचा मसुदा कामगार संघटनेकडे पाठविण्यात आल्याचे महामंडळाच्या सूत्रांनी सांगितले. या मसुद्यामध्ये काही सुधारणा करायच्या असतील तर त्या सुचवण्याची संधी असून मसुदा न पाहताच करारावर स्वाक्षरी घेतली जाणार नाही, असेही सूत्रांनी सांगितले.