मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने फेसबुकला एक व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये तो एका जखमी पक्ष्याची काळजी घेताना दिसत आहे. डिहायड्रेशन झाल्याने घार जखमी अवस्थेत सचिन तेंडुलकरच्या बाल्कनीत येऊन बसली होती. यानंतर सचिनने तिची काळजी घेत एका एनजीओच्या हवाली केलं. तीनच दिवसांत ही घार बरी झाली आणि पुन्हा एकदा आकाशी झेप घेतली. सचिनने फेसबुकवर हा संपुर्ण व्हिडीओ शेअर केला आहे.

उन्हाचा फटका बसल्याने तसंच डिहायड्रेशनमुळे घार उडू शकत नव्हती. सचिन तेंडुलकरने व्हिडीओत सांगितल्याप्रमाणे, काही कावळे तिच्यावर हल्ला करत होते, यामुळे सुरक्षेसाठी तिने बाल्कनीत येऊन आसरा घेतला होता. सचिनने जखमी झालेल्या त्या पक्ष्याला काही चिकनचे तुकडे आणि ब्रेड देऊन भरवण्याचा प्रयत्न केला असता तो यशस्वी झाला. हा आपल्यासाठी अत्यंत मोलाचा क्षण असल्याचंही तो व्हिडीओत सांगतोय.

यानंतर सचिन एनजीओच्या दोन लोकांसोबत व्हिडीओत दिसत आहे, ज्यांनी घार अत्यंत थकली असून कडक उन्हाचा फटका बसल्याने डिहायड्रेशन झाल्याचं सांगितलं. त्यांनी एका बॉक्समध्ये तिला ठेवून भरवण्याचा प्रयत्न केला. तिला बरं होण्यासाठी किमान पाच ते दहा दिवस लागलीत असं ते सचिनला सांगतात. पण एनजीओ आणि सचिनने घेतलेल्या काळजीमुळे तीन दिवसातच घार बरी होते. यानंतर सचिन तिची सुटका करत आकाशी झेप घ्यायला लावताना दिसत आहे.

यावेळी सचिनने सर्वांसाठी एक संदेश दिला असून आपल्या घराबाहेर, गच्चीवर तहानलेल्या पक्ष्यांसाठी पाणी ठेवण्याचं आवाहन केलं आहे. जेणेकरुन पक्ष्यांना डिहाड्रेशनचा त्रास होणार नाही आणि त्यांची तहानही मिटेल.