सरकार, देशवासीयांकडून साक्षीची अपेक्षा

‘ऑलिम्पिकमध्ये वा इतर महत्त्वाच्या स्पर्धामध्ये खेळाडूंनी पदक जिंकल्यानंतर त्याच्यावर कौतुकाचा, बक्षिसांचा वर्षांव होतो तो साहजिक आहे. मात्र खेळाडूंना असा पाठिंबा पदक जिंकण्याच्या आधीपासूनच मिळायला हवा; कारण जिंकण्यासाठी अशा पाठिंब्याची गरज असते. सरकार व देशवासीयांनी तो द्यायला हवा’, अशी अपेक्षा व्यक्त करीत, रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारी कुस्तीपटू साक्षी मलिकने देशवासीयांच्या मानसिकतेवर नेमके बोट ठेवले आहे. खास ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत साक्षीने या महत्त्वाच्या विषयावर भाष्य केले.

‘पदक जिंकण्याची एक प्रक्रिया असते. लोकांनी त्या प्रक्रियेत खेळाडूंच्या पाठीशी उभे रहायला हवे. त्यांना मदत करायला हवी. स्पर्धेआधीच्या काळात खेळाडूंची विचारपूस व्हायला हवी. त्यांच्याशी संवाद साधला जायला हवा. त्यांची गुणवत्ता, खेळ यांचा आदर व्हायला हवा’, अशी अपेक्षा साक्षीने सरकार, तसेच देशवासीय या दोन्ही घटकांकडून व्यक्त केली. ‘मी ऑलिम्पिकसाठी कसून, जीव तोडून सराव करीत होते, तेव्हा आमच्या गावातले कुणी माझ्याकडे ढुंकूनही बघत नव्हते. मोठी आलीये कुस्ती खेळणारी. जशी काही जगच जिंकणार आहे, अशीच काहीशी भावना त्यांच्या डोळ्यांत दिसायची. ते माझ्याशी धड बोलत देखील नव्हते. पण रिओमध्ये देशासाठी पदक जिंकल्यानंतर तीच माणसे आज मिठाई, फुलगुच्छ, आणि कायकाय भेटी घेऊन येत असतात मला भेटायला’, असे साक्षीने सांगितले.    ‘देशात क्रीडासंस्कृती आहे का’, या प्रश्नाला साक्षीने होकारार्थी उत्तर दिले. ‘होय, आपल्याकडे क्रीडा संस्कृती आहे, फार चांगले खेळाडू आहेत, ते पदक जिंकत आहेत. बरेच लोक खेळासाठी पायाभूत सुविधा उभारत आहेत. जेएसडब्ल्यूसारखी कंपनी माझ्यासहित काही खेळाडूंच्या पाठिशी सर्वतोपरी उभी आहे’, असे तिने नमूद केले.