मद्यधुंदावस्थेत गाडी चालवून पाच जणांना चिरडल्याप्रकरणी अभिनेता सलमान खान याच्यावर सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली खटला चालविण्यास वांद्रे महानगर दंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या परवानगीच्या विरोधात सलमान खानने मंगळवारी सत्र न्यायालयात धाव घेतली. बुधवारी त्याच्या अर्जावर सुनावणी होणार आहे. वांद्रे महानगरदंडाधिकाऱ्यांनी सलमानवर सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली खटला चालविण्यास हिरवा कंदील दाखविला होता. हा आरोप गंभीर असल्याने हे प्रकरण सत्र न्यायालयाकडे वर्ग केले होते. आतापर्यंत निष्काळजीपणे आणि बेदरकारपणे गाडी चालविल्याच्या आरोपाखाली सलमानवर खटला चालविण्यात येत होता. मात्र महानगरदंडाधिकाऱ्यांच्या या निर्णयानंतर जवळपास महिन्यानंतर सलमानने नव्याने लावण्यात आलेला सदोष मनुष्यवधाचा आरोप रद्द करण्याच्या मागणीसाठी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. सलमानवरील नव्या आरोपाच्या खटल्याची सुनावणी ११ मार्च रोजी सत्र न्यायालयात होणार आहे. त्याच्या एक आठवडा आधी म्हणजेच मंगळवारी सलमानने सत्र न्यायालयात धाव घेत आपल्यावर लावण्यात आलेला आरोप रद्द करण्याची मागणी केली आहे. मंगळवारी त्याच्या अर्जावर सुनावणी होणार असून न्यायालय काय निर्णय देणार यावर सलमानचे भवितव्य अवलंबून आहे.