वैद्यकीय, दंतवैद्यकीय अभ्यासक्रमासह आरोग्य विज्ञान शाखेतील विविध अभ्यासक्रमांसाठी राज्याच्या पातळीवरील आरक्षित जागांवरील विद्यार्थ्यांसाठीही खुल्या प्रवर्गाप्रमाणेच पात्रता गुण ठेवण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. केंद्राने लागू केलेली सांविधानिक आरक्षणे वगळून नव्याने लागू करण्यात आलेल्या आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटक आणि मराठा आरक्षणांतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश पात्रता गुण हे खुल्या गटाला समाम असतील. याबाबत वैद्यकीय शिक्षण संचालनालय आणि आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे शासनाने अभिप्राय मागवला आहे.

राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत यंदापासून लागू करण्यात आलेल्या आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांसाठी आणि मराठा विद्यार्थ्यांसाठी आरक्षण लागू करण्यात आले. या प्रवर्गाचे प्रवेश पात्रता गुण (कट ऑफ) आणि खुल्या गटातील प्रवेश पात्रता गुणांमध्ये मोठी तफावत होती. विद्यार्थ्यांपेक्षा उपलब्ध जागा अधिक असल्यामुळे या प्रवर्गाचे कट ऑफ गुण घसरले होते. त्याचप्रमाणे प्रवेश घेण्यासाठी ठरवण्यात आलेल्या किमान गुणांचे निकषही या प्रवर्गासाठी शिथिल करण्यात आले होते. वैद्यकीय अभ्यासक्रमांना लागू करण्यात आलेल्या या आरक्षणांच्या अंमलबजावणीवरून अनेक वाद निर्माण झाले. पालक आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ‘सेव्ह नेशन सेव्ह मेरिट’ ही चळवळ सुरू केली. सर्व प्रवर्गासाठी समान पात्रता गुण (क्वालिफाइंग मार्क्स) असावेत अशी मागणी करण्यात आली होती. सेव्ह नेशन सेव्ह मेरिट चळवळीतील कार्यकर्ते आणि मुख्यमंत्र्यांमध्ये झालेल्या बैठकीत या मुद्दय़ाबाबत चर्चा झाली होती. त्यानुसार केंद्र शासनाकडून किमान पात्रता गुण निश्चित करण्यात येणार अभ्यासक्रम आणि प्रवर्ग वगळून इतर आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी समान पात्रता गुण निश्चित करण्याबाबत शासनाने वैद्यकीय शिक्षण संचालनालय आणि आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे अभिप्राय मागितला आहे.

याबाबत निर्णय झाल्यास अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय यांसह प्रचलित पद्धतीनुसार काही प्रवर्गाना देण्यात येणारी गुणसवलत कायम राहील. मात्र नव्याने देण्यात आलेल्या मराठा आणि आर्थिकदृष्टय़ा मागास विद्यार्थ्यांना प्रवेश पात्रतेसाठी गुणांची सवलत मिळणार नाही. त्याचप्रमाणे राखीव प्रवर्गातील रिक्त जागांवर खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतील.