महापालिका दीड कोटी रुपये खर्च करून सुविधा देणार; विल्हेवाटीसाठीही यंत्रणा

मुंबई महापालिका शाळेतील शौचालयांपाठोपाठ शहरातील सार्वजनिक शौचालयांतही ‘सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन’ बसवण्याचा निर्णय घेत महापालिकेने महिलांना दिलासा दिला आहे. नॅपकिनची विल्हेवाट लावण्यासाठी इनसिनरेटर यंत्रेही बसविली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात २३५ सार्वजनिक शौचालयांत ही यंत्रे बसविण्यात येणार आहेत.

झोपडपट्टीतील महिला सॅनिटरी नॅपकिन वापरत असल्या तरी त्यांची विल्हेवाट कशी लावावी, याचे ज्ञान त्यांच्यापैकी अनेकींना नसते. अनेकदा सार्वजनिक शौचालयाजवळ तशी सुविधाही उपलब्ध नसते. त्यामुळे हे नॅपकिन सर्रास कचऱ्यात टाकले जातात. त्यामुळे रोगराई व जंतुसंसर्ग होण्याची दाट शक्यता असते. काही महिला नॅपकिन शौचकुपात टाकतात. त्यामुळे मलवाहिन्या तुंबतात आणि मलकुंड भरून पुन्हा त्याचा त्रास वस्तीतील रहिवाशांनाच होता. सॅनिटरी नॅपकिन इनसिनरेटर मशीनमध्ये जाळून व त्याचे राखेत रूपांतर करता येते. ही यंत्रे बसवण्यात आल्यामुळे त्यामुळे सार्वजनिक स्वच्छतेला हातभार लागणार आहे.

१ कोटी ५९ लाख रुपये खर्च

मुंबईतील २३५ सार्वजनिक शौचालयांमध्ये ही यंत्रे बसविली जाणार आहेत. पालिकेने कामाचे आदेश दिल्यानंतर १,१७,५०० सॅनिटरी नॅपकिनचा पुरवठा करण्यात येणार आहे. हा पुरवठा आठ महिन्यांत करण्यात येईल. त्यासाठी पालिकेला ५ लाख ६४ हजार रुपये खर्च येणार आहे. प्रत्येक यंत्राची किंमत ३०,७४४ रुपये असेल. त्यानुसार ७२,२४,८४० रुपये इतका खर्च या यंत्रांवर केला जाणार आहे. सॅनिटरी नॅपकिन इनसिनरेटर मशीनचा पुरवठा, उभारणी, चाचणी व ते कार्यान्वित करण्यासाठी ३४,५३० रुपये इतका खर्च येणार आहे. सर्व २३५ यंत्रांकरिता ८१ लाख १४ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.