19 November 2019

News Flash

विस्तारीकरणाच्या कामामुळे प्रवासाचा मनस्ताप

कुर्ला ते सांताक्रूझदरम्यान दररोज १२ तास कोंडीचे

|| सुहास जोशी

कुर्ला ते सांताक्रूझदरम्यान दररोज १२ तास कोंडीचे

अत्यंत दाट वस्ती, नावापुरते असलेले पदपथ, खराब झालेले रस्ते आणि चेंबूर-सांताक्रूझ जोड रस्त्याच्या (एससीएलआर) विस्तारीकरणाचे काम यामुळे कुर्ला ते सांताक्रूझदरम्यानचा रस्तेप्रवास म्हणजे निव्वळ मनस्ताप ठरत आहे. सकाळी आठपासून या रस्त्यावर सुरू होणारी वाहतूक कोंडी रात्री नऊ-दहापर्यंत सुरूच असते. पूर्व-पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या रस्त्यांमध्ये महत्त्वाचा रस्ता म्हणून सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड ओळखला जातो. या लिंक रोडने पूर्व द्रुतगती मार्गावरून कुर्ला गाठल्यानंतर  पुढे सांताक्रूझपर्यंत पोहचणे म्हणजे महाकर्मकठीण काम झाले आहे.

कुर्ला स्थानकापासून होणाऱ्या प्रवासाची सुरुवातच मुळी अतिशय चिंचोळ्या रस्त्याने होते. केवळ दोनच वाहने जाऊ शकतील अशा या मार्गावर अनेक दुकाने, शाळा आणि निवासी वस्ती यांची दाटीवाटी आहे. कैकवेळा हा रस्ताच पार करण्यात पंधरा-वीस मिनिटे लागतात. हा रस्ता एससीएलआरला जेथे जोडला जातो तेथून वाहनांची गर्दी वाढू लागते. पूर्व द्रुतगती मार्गावरून येणाऱ्या वाहनांच्या लोंढय़ात सामील व्हायचे आणि एलबीएस मार्गावरील उड्डाणपुलावरून मुंगीच्या गतीने जात राहायचे इतकेच काय ते आपल्या हातात असते. उड्डाणपूल उतरल्यावर दुसरेच संकट उभे राहते. एलबीएसवरून वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सकडे जाणारी वाहतूकदेखील याच रस्त्यावर येते. मात्र तेथे मिठी नदीवरील अरुंद पूलामुळे ही सगळी वाहतूक अक्षरश: एकाच जागी अडकून पडते.

याच ठिकाणी रस्त्याच्या दोहोबाजूस वाहनांच्या भंगाराची दुकाने आहेत आणि रस्त्याच्या मधोमध एससीएलआरच्या विस्तारीकरणासाठीचे काम सुरू आहे. त्यासाठी रस्तारोधक लावल्याने केवळ दोन वाहनांनाच कशीबशी वाट काढता येते. मिठी पार केल्यानंतर वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सकडे जाणाऱ्या चौकातील सिग्नलवर पुन्हा पंधरा-वीस मिनिटे रखडायला होते. किमान तीन सिग्नल पूर्ण झाल्याशिवाय येथून सुटका होत नाही. त्या कोंडीतून सुटका झाल्या झाल्या पुढे विद्यापीठापर्यंतच्या रस्त्यावर रस्त्याच्या मधोमध एससीएलआरच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू असल्याने केवळ एकच वाहन जाण्याइतपत रस्ता मिळतो. या मार्गावर अनेक ठिकाणी खांबाचे काम पूर्ण झाले असून गर्डरदेखील बसवून झाले आहेत. मात्र रस्ता रोधकांमुळे सारा प्रवास जिकिरीचा झाला आहे.

विद्यापीठापासून पुढे सांताक्रूझपर्यंतचा प्रवास अतिशय दाट वस्तीतून होत राहतो. त्यामुळे तेथे कधीही वाहतूक कोंडी निर्माण होऊ शकते. हाच प्रवास सांताक्रूझ ते कुर्ला असा करताना सर्वाधिक कोडींची ठिकाणंदेखील सारखीच आहेत. त्यात भर पडते ती एससीएलआरवरून कुर्ला स्थानकाच्या दिशने बसगाडय़ांची लांबच लांब रांग सायंकाळी न चुकता पाहायला मिळते. परिणामी अनेक प्रवासी बस सोडून चालतच कुर्ला स्थानक गाठतात.

चालत जायचं की बसने?

कुर्ला स्थानक ते विद्यापीठ या मार्गावर अनेक वर्षे रोज प्रवास करणारे प्रा. कृष्णा अय्यर सांगतात की, या संपूर्ण रस्त्यावर दोन वर्षांपासून सतत वाहतूक कोंडी होत असते. एससीएलआर सुरू झाल्यानंतर पुढील मार्ग अरुंद असल्याने या कोंडीत भर पडली. सायंकाळच्या कोंडीमुळे विद्यापीठ ते कुर्ला स्थानक प्रवासासाठी ४५ मिनिटे लागतात. या रस्त्यावर चालत जरी गेले तर ३५ मिनिटात पोहचता येते. पण पदपथांची अवस्था अतिशय खराब असल्याने व काही ठिकाणी पदपथच नसल्याने चालण्याचा मार्गदेखील स्वीकारता येत नाही. पर्यायी मार्ग वेळेच्या दृष्टीने व्यवहार्य नसल्याने त्याचादेखील फायदा होत नाही.

First Published on June 12, 2019 2:38 am

Web Title: sclr traffic jam
Just Now!
X