13 July 2020

News Flash

बाजारगप्पा : गाडय़ांच्या सुट्टय़ा भागांचा ‘मॉल’

अशा या ‘मॉल’मध्ये एखादी महिला पाहिल्यानंतर बाजारातल्या नजरा नवलाईने पाहू लागतात.

 

या बाजारात रंगीबेरंगी कपडय़ांऐवजी सायलेंसर, रेडियेटर बाजाराची शोभा वाढवतात. जागोजागी रचून ठेवलेले बंद इंजिनाचे ढीग ग्राहकाला आकर्षित करतात. विविध आकारांची पाने, ड्रॉवरमध्ये निपचित पडून राहिलेले स्क्रू, लहान-मोठय़ा आकाराचे ‘टायर’ अशा वस्तूंनी हा बाजार बहरतो. ही आहे मुंबईच्या मध्यवर्ती वसलेली भंगार लोखंडाची बाजारपेठ. पण आहे खूप कामाची!

महिलांची गर्दी.. दुकांनांबाहेर लावलेले रंगीबेरंगी कपडे.. हिरव्यागार भाज्या रचून ठेवलेल्या.. काचेच्या दालनामध्ये चकाकणाऱ्या इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू.. तोंडाला पाणी सुटावे अशी फळे.. आणि किमतीची घासाघीस करणाऱ्या महिलांची रांग. सर्वसाधारणपणे बाजारांमध्ये असेच चित्र असते. शॉपिंग ही मानसिक आरोग्य सुधारण्याची थेरेपी मानली गेल्यामुळे आजूबाजूचे चकाकणारे, नावीन्याने व चत्यन्याने भरलेले बाजार सर्वाना आकर्षित करतात.

बाजारांच्या या सर्व कल्पनांना छेद देत ‘कळकटपणा’ हा स्थायिभाव असलेली एक बाजारपेठ मुंबईतील कुर्ला पश्चिमेला गेली ४० ते ४५ वष्रे नांदत आहे. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या बाजारातील चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये ही दुकाने थाटलेली आहे. या बाजारात मात्र रंगीबेरंगी कपडय़ांऐवजी सायलेंसर, रेडियेटर बाजाराची शोभा वाढवतात. जागोजागी रचून ठेवलेले बंद इंजिनाचे ढीग ग्राहकाला आकर्षित करतात. विविध आकारांची पाने, ड्रॉवरमध्ये निपचित पडून राहिलेले स्क्रू, लहान-मोठय़ा आकाराचे ‘टायर’ अशा वस्तूंनी हा बाजार बहरतो. ही आहे मुंबईच्या मध्यवर्ती वसलेली स्क्रॅप पार्टची बाजारपेठ. काही जणांसाठी चोर बाजार काहींसाठी भंगार बाजार तर कुणासाठी प्रत्येक गाडय़ांचे प्रत्येक सुटे भाग मिळणारा बाजार. कुर्ला सीएसटी रोडवरील पूल ओलांडत असतानाच रस्त्याच्या दुतर्फा गाडय़ांच्या सुट्टय़ा भागांची सुमारे ५००हून अधिक दुकाने आहेत. मुंबईतील तसेच आसपासच्या परिसरातील गॅरेजवाल्यांसाठी हा गाडय़ांच्या सुट्टय़ा भागाचा आणि ऑटोमोबाइल क्षेत्रातील हव्या त्या गोष्टी शंभर टक्के मिळतील अशी ग्वाही देणारा एक प्रकारचा मॉलच आहे.

अशा या ‘मॉल’मध्ये एखादी महिला पाहिल्यानंतर बाजारातल्या नजरा नवलाईने पाहू लागतात. मलाही तो अनुभव आलाच. मी कुठे जाते, मी काय बोलते याकडे त्या सर्वाचे लक्ष होते. प्रश्नांची सरबत्ती केल्यावर मात्र त्यांनी बोलायला सुरुवात केली. सुमारे ५० वर्षांपूर्वी हा परिसर दलदलीने व्यापलेला होता. तेव्हा येथे भंगाराची चार ते पाच दुकाने होती. मात्र हळूहळू ही दुकाने वाढत गेली. आता तर जुन्याबरोबर नवीन गाडय़ांचे भाग मिळणारी दुकानेही येथे सुरू झाली आहे. गुजरातपासून ते कर्नाटकापर्यंत मोडीत निघालेल्या गाडय़ा येथे आणल्या जातात. आलेल्या जुन्या गाडय़ांची तोडफोडही या परिसरातच मिठी नदीच्या काठावर केली जाते. या गाडय़ांमधून निघालेले तेल, दूषित द्रव्य मिठी नदीत स्वाहा केले जाते. आतापर्यंत या काठावर लाखो गाडय़ांचे शवविच्छेदन करण्यात आले असेल. शवविच्छेदनाचे काम उत्तर प्रदेश, बिहार येथून आलेल्या स्थलांतरितांच्या हातात असते. त्यांना एका गाडीमागे एक हजार रुपये मजुरी मिळते. साधारण एक गाडी तोडण्यासाठी चार ते पाच तासांचा अवधी लागतो. दुकानाचा मालकही मोडकळीस आलेली गाडी खरेदी करतो आणि यातून काढलेले बॅटरी, काबरेरेटर, वायर, सायलेंसर, इंजिन्स, मडगार्ड, रेडियेटर, स्क्रू, दरवाजे, ब्रेक, आदी भाग काढून दुकानाच्या मालकाला दिले जातात.

या बाजारात अगदी श्रीमंतापासून ते गॅरेजमध्ये काम करणारा व्यक्तीही खरेदीसाठी येतो. येथे प्रत्येक गाडीचा प्रत्येक भाग मिळेल असे म्हटले जाते. त्यामुळे जुन्या गाडीचा एखादा भाग बंद पडला तर तो महागडा भाग अगदी अध्र्या किमतीत येथे मिळतो. बाजारात तयार होत नसलेल्या जुन्या मॉडेलच्या गाडय़ांचे भाग मात्र दामदुपटीने विकले जातात. अगदी स्कोडा, मर्सिडिज, बीएमडब्लू, ऑडी, फियाट, फोक्स वॅगन, टोयोटा यांसारख्या महागडय़ा गाडय़ांचे भागही येथे अर्धा किमतीत विकले जातात. रद्दीत निघालेले वर्तमानपत्र विकावे त्याचप्रमाणे मोडकळीस आलेल्या गाडय़ा, चोरीच्या गाडय़ा या बाजारात येऊन विकल्या जातात. विकणारा माल जरी मोडकळीस किंवा जुना असला तरी येथे येणारा ग्राहक मात्र अनेकदा फर्स्ट हॅण्ड गाडय़ा विकणाराही असतो. ऑटोमोबाइल महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी प्रकल्प तयार करण्यासाठी या बाजारातून गाडय़ांचे भाग घेऊन जातात. तर अनेकदा भागांची माहिती विचारतात. या दुकानातील फरशीबरोबर चेहऱ्याचा रंगही ओळखता येऊ नये अशा वातावरणात ही मंडळी काम करतात. ‘ग्रीसमय’ झालेली ही मंडळी किती ध्येयवेडी आहेत हे त्यांच्या कपडय़ांवरून दिसते. अनेक कामगारांनी काम शिकून येथेच स्वत:चे दुकानही सुरू केले आहे. या बाजाररूपी मॉलमध्ये कामगारांच्या खाण्याचीही चंगळ असते. प्रत्येक गल्लीत चहाची टपरी तर हमखास पाहावयास मिळते. त्याशिवाय चिकन आणि मटण बिर्याणी विकणारी मंडळी मोठमोठी पातेली घेऊन गाडीवर उभी असतात. सोबत फळांच्या गाडय़ाही असतात. हा बाजार मुस्लीमबहुल असल्यामुळे रमजानच्या दिवसात बाजारातील बहुतांश दुकाने बंद असतात.

येथे काम करणाऱ्या कामगारांचे फार फार तर शालेय शिक्षण झाले आहे. मात्र असे असतानाही त्यांना गाडय़ांची इत्थंभूत माहिती असते. प्रत्येक दुकानात दोन ते तीन कामगार म्हणजे सुमारे एक ते दीड हजार इतके कामगार येथे काम करतात. व्यवसाय चांगला असेल तर एका दुकानात लाखांचीही उलाढाल होते. असा विचार केला तर दर महिन्याला काही शे कोटींची उलाढाल या एक किलोमीटर परिसरातील बाजारात होते. भंगालाराही किती किंमत असते ते या बाजारात पाऊल ठेवल्यावर लक्षात येते. अगदी मोडतोड केलेल्या गाडय़ांतील लोखंडही विकले जाते. १६ रुपये किलोने विकले जाणार हे लोखंड मोठय़ा कंपन्या विकत घेतात आणि ते वितळून पुन्हा त्यापासून गाडय़ांचे भाग तयार केले जातात. यामुळे या बाजारातील भंगाराला मोठी मागणी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2017 12:55 am

Web Title: scrap market in kurla car spare parts market in kurla four wheeler auto part in kurla
Next Stories
1 तपासचक्र : गॅरेज व्यवसायातून चौर्यकर्म
2 बाळासाहेब ठाकरे स्मारक सुधारित विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर
3 सफाळे येथे मालगाडीचे डबे घसरले, मुंबई-गुजरात रेल्वे वाहतूक ठप्प
Just Now!
X