महाड येथील पूल दुर्घटनेच्या पाश्र्वभूमीवर शहरातील २७४ पुलांची पाहणी करण्याचे पालिकेने ठरविले असून त्यासाठी सव्वा दोन कोटी रुपये खर्च येणार आहे. पुढील आठ महिन्यात हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.

शहरात ३१४ पूल आहेत. त्यातील नवीन पूल तसेच पुनर्बाधणी प्रस्तावित असलेल्या पुलांची संख्या ४० आहे. हे पूल वगळून उर्वरित पुलांची mv08सूची पालिकेने तयार केली असून दक्षिण शहर, पूर्व व पश्चिम उपनगरांसाठी स्वतंत्र कंपन्यांकडे सर्वेक्षण देण्याचा प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर झाला. शहर विभागात ७७ पूल असून या पुलांची पाहणी करण्याचे काम डी. डी. देसाईज असोसिएटेडकडे देण्यात आले आहे. या कामासाठी ६३ लाख रुपये खर्च येणार आहे. पश्चिम उपनगरात १३७ पूल असून काम सी. वी. कांड कन्सल्टंट्स १ कोटी ५ लाख रुपयांच्या कंत्राटाद्वारे या पुलांचे सर्वेक्षण करणार आहे. पूर्व उपनगरासाठी स्ट्रक्टवेल डिझायनर्स अ‍ॅण्ड कन्सल्टंट प्रा. लि.ची निवड झाली असून त्यांना ४९ लाख रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहेत. पूर्व उपनगरात ६० पूल आहेत.

पुलांच्या पाहणीसाठी विविध प्रकारच्या १७ पाहण्या करण्यात येणार असून गरज पडल्यास ना विध्वंसक चाचणी (नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट) करण्याचेही प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.