05 March 2021

News Flash

जादा थांबे, सवलतींमुळे युलू ई-बाइकला पसंती

तीन महिन्यांत सात हजार ग्राहकांकडून वापर

वांद्रे-कुर्ला संकुलातील युलू ई-बाइकला गेल्या तीन महिन्यांत प्रतिसाद वाढला असून गेल्या महिन्यात सात नवीन स्थानकांची तसेच ई-बाइकची संख्या वाढविण्यात आली, तर तीन महिन्यांत सात हजार ग्राहकांनी ई-बाइकचा वापर केला.  

लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुलातील युलू ई-बाइकला गेल्या तीन महिन्यांत प्रतिसाद वाढला असून गेल्या महिन्यात सात नवीन स्थानकांची तसेच ई-बाइकची संख्या वाढविण्यात आली, तर तीन महिन्यांत सात हजार ग्राहकांनी ई-बाइकचा वापर केला.

वांद्रे (पूर्व) ते कुर्ला (पश्चिम) दरम्यानच्या प्रवासासाठी ई-बाइक वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सप्टेंबरपासून वांद्रे-कुर्ला संकुलात युलू ई-बाइकची सुरुवात झाली. सुरुवातीला वांद्रे (पूर्व) रेल्वे स्थानक आणि वांद्रे-कुर्ला संकुलात एकूण १० ठिकाणी युलू ई-बाइक उपलब्ध होत्या. महिनाभरातच कलानगर जंक्शन येथेही युलू स्थानक सुरू करण्यात आले. ई-बाइकचा वाढता प्रतिसाद पाहता गेल्या महिन्यात आणखी सात ठिकाणी स्थानके उभारल्याची माहिती युलूच्या अधिकाऱ्यांनी दिली.

सध्या युलू ई-बाइकची १८ स्थानके असून अद्याप कुर्ला (पश्चिम) रेल्वे स्थानकाबाहेर ही सुविधा उपलब्ध नाही. यासाठी युलूमार्फत महापालिकेस प्रस्ताव दिला असून लवकरच तिथेही ही सुविधा उपलब्ध होईल, असे युलूच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सुविधा सुरू झाली तेव्हा केवळ ११० ई-बाइक उपलब्ध होत्या, त्यामध्ये प्रतिसादानुसार वाढ होत असून या आठवडय़ाअखेरीस ही संख्या ४५० पर्यंत पोहोचेल. करारानुसार ५०० बाइकची सुविधा देण्याचे युलूचे उद्दिष्ट आहे.

तीन महिन्यांत एकूण सात हजार नवीन वापरकर्त्यांनी एक लाख ६२ हजार किमी अंतरासाठी युलू ई-बाइक वापरली. यामध्ये एकूण २७ हजार फेऱ्या झाल्या असून इंधनाचा वापर कमी झाल्याने १६ टन कार्बन उत्सर्जन कमी झाल्याचे एमएमआरडीएने सांगितले.

एमएमआरडीएच्या माध्यमातून शहर आणि महानगर परिसरात भविष्यात निर्माण होणाऱ्या ३३७ किमी मेट्रो जाळ्याच्या अनुषंगाने ‘फर्स्ट आणि लास्ट माइल कनेक्टिव्हिटीसाठी’ अनेक उपाय योजले जात आहेत. त्याच माध्यमातून ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.

नव्या ग्राहकांसाठी सवलत

नवीन ग्राहकांना युलूकडे आकर्षित करण्यासाठी विशेष सवलत योजनादेखील या महिन्यापासून देण्यात येत आहे. अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर नवीन वापरकर्त्यांच्या खात्यात दीड हजार रुपये युलूतर्फे देण्यात येतील. दिवसाला त्यापैकी केवळ ५० रुपये ग्राहकास खर्च करता येतील, तर एकूण वापरावर ३० टक्के  सवलत (५० रुपयांपर्यंत) देण्यात येईल.

र्निजतुकीकरणाची माहिती

करोनाच्या पाश्र्वभूमीवर बाइकचे सातत्याने र्निजतुकीकरण केले जात असून, बाइक स्थानकावरून घेतानाच र्निजतुकीकरण केव्हा केले याची माहिती अ‍ॅपवर दिसू शकेल. तसेच प्रत्येक ई-बाइकची बॅटरी कितपत आहे याचीदेखील माहिती कळू शकेल. पूर्ण चार्ज असलेली ई-बाइक सुमारे ५० किमी अंतर कापू शकते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2020 12:50 am

Web Title: seven thousand customers used yulu ebike in three months dd70
Next Stories
1 करोनाकाळात १३३ अल्पवयीनांचे घरातून पलायन
2 न्यायालयाचा वेळ वाया घालवू नका
3 पालिकेच्या १७० कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट
Just Now!
X