काँग्रेससोबत आघाडी झाली असती, तर पुन्हा सत्ता मिळाली असती आणि पक्षावर आज ही वेळ आली नसती, अशी कबुली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या १७ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना शरद पवार यांनी संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेससोबत आपली आघाडी झाली असती, तर राज्यात पुन्हा आपल्याला सत्ता मिळाली असती. काँग्रेसमुळेच आघाडी होऊ शकली नाही आणि सत्ता गमवावी लागली.

पवार यांनी आपल्या भाषणात मोदी सरकारवरही जोरदार हल्ला चढवला. सत्तारुढ झाल्यानंतर मोदी सरकारने जाहिरातबाजीशिवाय दुसरे काहीच केले नाही. गेल्या दोन वर्षांत देशाच्या कृषी उत्पन्नात घट झाली असून, देशातील अन्नधान्य, कारखानदारी घटली आहे. त्यामुळे रोजगार देखील कमी झालेत. यासर्व परिस्थितीला केंद्रातील भाजप सरकार जबाबदार असल्याचे शरद पवार म्हणाले.

नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱयांवरही पवारांनी सडकून टीका केली. आपण भाजपचे नाही, तर देशाचे पंतप्रधान म्हणून परदेशात जातात हे मोदींनी लक्षात घेतले पाहिजे. दुसऱया देशात जाऊन आपल्या देशाची निंदानालस्ती करणे चुकीचे आहे. देशातील वास्तव भयाण असताना दुसऱया देशात जाऊन आपल्या कामाचा गवगवा करणे याला प्रामाणिकपणा म्हणत नाही. मोदी संपूर्ण देशाची दिशाभूल करत आहेत. मतदार राजा जाणता आहे याची दखल मोदींना आगामी निवडणुकीत घ्यावी लागेल. जनतेने मागील लोकसभा निवडणुकीत मोदींच्या पदरात भरभरून यश दिले. जनतेचा कौल आपण सर्वांनी स्विकारला. पण मोदींची लाट आता ओसरत चालल्याचे दिसून येते. म्हणूनच महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्यानंतर इतर राज्यात भाजपला अपेक्षित यश मिळवता आलेले नाही, असेही पवार म्हणाले.

शरद पवार यांच्या भाषणातील मुद्दे-

  • देशातील अन्नधान्य, निर्यात दोन वर्षात घटली आहे, कारखानदारी घटल्यामुळे रोजगार कमी झालेत, ही सर्व भाजप सरकारची देन
  • देशात सरकार बदललं, पण परिस्थिती जैसे थे
  • केंद्र आणि राज्य सरकारने आकसाने आपल्या नेत्यांना तुरुंगात टाकले
  • नरेंद्र मोदी भाजपाचे नाही तर देशाचे पंतप्रधान म्हणून परदेशात जातात हे लक्षात ठेवा
  • पंतप्रधान मोदींची लाट आता ओसरली आहे. म्हणून महाराष्ट्रात सत्ता बदल झाल्यानंतर इतर राज्यात भाजपला अपेक्षित यश मिळवता आले नाही
  • दोन वर्षांत निर्यात घटल्याने देशाचे मोठे नुकसान
  • देशाचे कृषी उत्पन्न घटले
  • परदेशात जाऊन देशाची निंदानालस्ती करणं चुकीचं
  • राष्ट्रवादीचं धोक्याचं सोळावं वरीस संपलं
  • मोदी सरकारने दोन वर्षात केवळ जाहीरातबाजी केली
  • आज प्रतिकूल परिस्थितीला मागे सारत, त्यातून बाहेर पडून पक्षाचा १७ वा वर्धापन दिन आपण साजरा करत आहोत